गुगल मॅपवर बिगबी करणार दिशा मार्गदर्शन?

फोटो साभार रिपोर्ट डोअर

बॉलीवूड शेहेनशहा अमिताभ बच्चन उर्फ बिगबी यांच्या अभिनयाचे चाहते देश विदेशात खूप मोठ्या प्रमाणावर आहेत तसेच त्याच्या धीरगंभीर आवाजावर फिदा असल्याची संख्याही करोडोमध्ये आहे. बिग बी यांचा खर्जातला खास आवाज आपण अनेकदा जाहिराती, चित्रपट, सोशल कॅम्पेनिंग मधून ऐकतो. आता हा आवाज मुंबईकर लवकरच नेव्हिगेशन साठी ऐकू शकणार असल्याचे समजते. गुगल मॅपने बिग बी यांनी त्यांचा आवाज नेव्हिगेशन साठी द्यावा यासाठी बोलणी सुरु केली आहेत असे खात्रीलायक वृत्त आहे.

सध्या मुंबईकरांना गुगल मॅप वर रस्ता सांगताना ऐकू येणारा आवाज न्यूयोर्कच्या कॅरन जेकब्सन यांचा आहे. मिड डे च्या रिपोर्ट नुसार गुगल बिग बी यांचा आवाज मुंबई नेव्हिगेशन साठी वापरण्यासाठी प्रयत्न करत आहे. बिग बी यांचा दमदार आवाज त्यांची खासियत आहे आणि देशात तो मोठ्या प्रमाणावर पसंत केला जातो. त्यामुळे गुगल मॅप साठी हा आवाज चांगला पर्याय ठरू शकणार आहे.

अर्थात खुद्द बिग बी आणि गुगल दोन्ही कडून या संदर्भात अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. मात्र या करारासाठी गुगल मॅप कडून बिग बी याना तगडी रक्कम देण्याचे संकेत दिले गेले आहेत. दरम्यान १२ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराणा यांचा गुलाबो सिताबो चित्रपट रिलीज केला जात आहे.

Leave a Comment