लॉकडाऊनमध्ये ‘पार्ले-जी’ने मोडला विक्रीचा 82 वर्षांचा विक्रम

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये भलेही अनेक उद्योग-धंदे बंद झाले असतील. मात्र या काळात पार्ले-जी बिस्किटांची एवढी विक्री झाली की 82 वर्षांचा विक्रम तुटला आहे. केवळ 5 रुपयांना मिळणारे पार्ले-जी बिस्किट शेकडो किमी चालत घरी निघणाऱ्या कामगारांसाठी उपयोगी ठरले. अनेकांनी घरात देखील या बिस्किटांचा साठा केला.

पार्ले-जी 1938 पासून लोकांच्या आवडीचे बिस्किट आहे. लॉकडाऊनमध्ये याने आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बिस्किट विकण्याचा विक्रम केला आहे. कंपनीने अचूक आकडा सांगितला नाही. मात्र मार्च ते मे हे मागील 8 दशकातील सर्वात चांगले महिने असल्याचे म्हटले आहे. पार्ले प्रोडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयंक शाह म्हणाले की, कंपनीचे एकूण मार्केट शेअर 5 टक्क्यांनी वाढले असून, यात 80-90 टक्के वाढ ही पार्ले-जीच्या विक्रीमुळे झाली आहे.

अनेक बिस्किट कंपन्यांनी लॉकडाऊन झाल्यानंतर ऑपरेशन सुरू केले होते. कंपन्यांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या जाण्या-येण्याची देखील सोय केली होती.  केवळ पार्लेच नाहीतर मागील तीन महिन्यात इतर कंपन्यांच्या बिस्किट विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तज्ञांनुसार, ब्रिटानियाचा गुड डे, टायगर, मिल्क बिकिस, बॉर्बर्न आणि मॅरी बिस्किट व्यतिरिक्त पार्लेचे क्रॅकजॅक, मोनॅको, हाइड अँड सीक सारख्या बिस्किटांची देखील मोठी विक्री झाली. लॉकडाऊनच्या काळात लोकांना ज्या वस्तू मिळत होत्या, त्या ते खरेदी करत होते.

मयंक शाह यांच्यानुसार, लॉकडाऊन दरम्यान पार्ले-जी लोकांसाठी सहज खाता येईल अशी गोष्ट होती. काहींसाठी तर हे एकमेव जेवण होते. जे लोक जेवण खरेदी करू शकत नव्हते ते पार्ले-जी बिस्किट खरेदी करायचे.

Leave a Comment