बिहारच्या या व्यक्तीने केली हत्तींच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती

काही दिवसांपुर्वी देशातील सर्व साक्षर राज्य असलेल्या केरळमध्ये अमानवीयरित्या फटाके असलेले अननस खाल्ल्याने गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला होता. मात्र आता बिहारमधील एका व्यक्तीने आपली संपत्ती चक्क दोन हत्तींच्या नावावर करत सर्वांसमोर उदाहरण ठेवले आहे. पटणा येथील दानापूरचे अख्तर इमाम यांनी आपली संपुर्ण संपत्ती दोन हत्ती मोती आणि राणीच्या नावावर केली आहे. एवढेच नाही तर अख्तर यांनी हत्तींसाठी ऐरावत नावाने ट्रस्ट देखील बनवले आहे.

अख्तर म्हणाले की, मोती आणि राणीच त्यांचे मित्र, कुटुंब आणि सर्वकाही आहेत. मात्र संपत्तीला हत्तींच्या नावावर केल्याने त्यांचे नातेवाईकच शत्रू झाले आहेत. अख्तर यांचा आरोप आहे की त्यांचा मुलगा मेराजने एकदा तस्करांना हत्ती विकण्याचा देखील प्रयत्न केला होता. अख्तर हत्तींवर एवढे प्रेम करण्याचे देखील कारण आहे. ते सांगतात की, एकदा रात्री बंदुक घेऊन काही लोक त्यांची हत्या करण्यासाठी आत घुसले. हे बघताच हत्तींनी आवाज करण्यास सुरूवात केली. यामुळे अख्तर जागे झाले व लोक पळून गेले.

अख्तर यांचा आरोप आहे की संपत्तीसाठी मुलाच्या प्रेयसीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप देखील केला होता. मात्र चौकशीत अख्तर यांनी गुन्हा केला नसल्याचे समोर आले. ते 12 वर्षांचे असल्यापासून हत्तींची सेवा करत आहेत. 10 वर्षांपुर्वी त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यांना सोडून माहेरी गेले आहेत.  अख्तर यांनी अर्धी संपत्ती पत्नीला दिली आहे. तर जवळपास 5 कोटींची संपत्ती दोन हत्तींच्या नावावर केली आहे. या दोन्ही हत्तींचा मृत्यू झाल्यास ऐरावत संस्थेचा संपत्तीवर अधिकार असेल.

Leave a Comment