अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर जगभरात ब्लॅक लाईव्हस मॅटर कँपेनने जोर पकडला आहे. याच पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजचा खेळाडू डॅरेन सॅमीने आरोप केला होता की आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. 2013 मध्ये आयपीएल दरम्यान त्याला वर्णभेदी शब्दाने संबोधित केले होते. तेव्हा या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता, मात्र जेव्हा त्याला हे समजले तेव्हा दुःख वाटल्याचे, तो म्हणाला होता.
सॅमीचा वर्णभेदाचा आरोप; ईशांत शर्माची 2014 ची पोस्ट व्हायरल
सॅमीने आरोप केला की, जेव्हा त्याला या नावाने बोलवायचे तेव्हा इतर सदस्य हसायचे. यानंतर वर्णभेदी नावाने सॅमीला कोण बोलवत असेल यावरून चर्चा सुरू झाल्या होत्या.
आता सोशल मीडियावर ईशांत शर्माची 2014 ची एक इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, सॅमी आणि डेल स्टेन दिसत आहे व फोटोच्या कॅप्शनमध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या नावाने संबोधण्यात आले आहे.
याशिवाय सॅमीचे 2014 चे एक ट्विट देखील व्हायरल होत असून, यात तो स्वतः व्हीव्हीएस लक्ष्मणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना डार्क काळू शब्दचा वापर करत आहे.