केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांची माहिती; शालेय अभ्यासक्रम आणि वेळ कमी करण्याच्या विचारात सरकार


नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी होत नसून उलट तो वाढतच आहे. अशा परिस्थितीत आगामी शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रमात आणि शाळांमधील तासिकांमध्ये कपात करण्याच्या विचारात सरकार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.


दरम्यान पोखरियाल यांनी सध्याची परिस्थिती पाहता आणि शिक्षक व पालकांकडून आलेल्या मोठ्या प्रमाणवरील मागणीचा विचार करता, येत्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात व तासिकांमध्ये आम्ही कपात करण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याचे म्हटले आहे. देशभरातील सर्व शैक्षणिक संस्था कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आल्या होत्या व इतर परीक्षांना स्थगिती देण्यात आली होती. पण पोखरियाल यांनी दोन दिवसांपूर्वीच १५ ऑगस्टनंतर शाळा सुरू होतील, असे संकेत दिले होते. जरी असे असले तरी सर्व काही येणाऱ्या वेळेवर अवलंबून राहणार आहे.

तत्पूर्वी राज्यांच्या शिक्षण सचिवांनी विद्यार्थांचे आरोग्य व सुरक्षा, शाळांमधील स्वच्छता संबंधी उपाय आणि ऑनलाइन व डिजिटल शिक्षणाशी निगडीत मुद्यांवर शालेय शिक्षण सचिव अनिता करवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. यानंतर केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट केले होते. राज्य सरकारांकडून शालेय शिक्षणासंबंधी मुद्यांवर महत्वाच्या सूचना मिळाल्या आहेत. विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. प्राप्त झालेल्या सूचनांवर निश्चित विचार केला जाईल. शिवाय, या सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, गृहमंत्रालय यांच्याकडेही पाठवल्या जातील असे ते म्हणाले होते.

Leave a Comment