आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा हा ड्रोन गर्दीतही शोधून काढणार कोरोना रुग्ण


हैदराबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असलेला आपला देश आता हळूहळू अनलॉक होऊ लागला आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मिळालेल्या शिथिलतेमुळे अनेक महिने घरात बंदिस्त असलेले नागरिक आता बाहेर पडू लागले आहेत. पण यामुळे अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात कोरोनाची लक्षणे अनेक रुग्णांमध्ये दिसत नसल्यामुळे आता अशा परिस्थिती कोरोनावर नियंत्रण ठेवणे म्हणजे एक मोठे आव्हानच आहे. पण यावर आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी मार्ग शोधून काढला आहे. एक असा विशेष ड्रोन त्यांनी तयार केला आहे, जो गर्दीतही कोरोनाबाधित रुग्णाला शोधून काढेल.

इंफ्रारेड कॅमेरा असलेला ड्रोन हैदराबादमधील आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. गर्दीच्या ठिकाणी हा ड्रोन प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान तपासेल. ज्याच्या शरीराचे तापमान जास्त असेल त्याची ओळख पटवण्यात हा ड्रोन सक्षम आहे. एक लाऊडस्पीकरही या ड्रोनमध्ये लावण्यात आला आहे. ज्यामार्फत ज्या व्यक्तीचे शरीराचे तापमान जास्त आहे, त्या व्यक्तीला थांबवण्याची किंवा गर्दीतून बाजूला होण्याची सूचना देता येऊ शकते.

एअरबोर्न इन्फ्रारेड कॅमेऱ्याची थर्मल स्क्रिनिंगसाठी विविध प्रकारे चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी ठरल्याचे कंपनीने सांगितले. मारुत ड्रोनचे सीईओ प्रेम कुमार विशालावथ यांनी सांगितले, या ड्रोनमार्फत होणाऱ्या थर्मल स्क्रिनिंगचा फायदा म्हणजे एका-एका व्यक्तीची तपासणी करण्याची गरज नाही. गर्दीतही ताप असलेल्या व्यक्तीला ओळखून त्याची कोरोना टेस्ट करता येऊ शकते. या ड्रोनची चाचणी घेण्यात आली असून त्यात हे ड्रोन यशस्वी ठरले आहे. हैदराबाद आणि करीमनगर पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये या ड्रोनचा वापर केला होता. अनलॉकच्या कालावधीतही कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात एअरबोर्न थर्मल स्क्रिंनिंगची मदत होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

Leave a Comment