पाकचा बालिश प्रश्न; लडाखमध्ये भारत का करत नाही सर्जिकल स्ट्राइक?


नवी दिल्ली – सध्या भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सीमेवरुन तणाव असून काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांच्या लष्कराची यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे सकारात्मक परिणाम दिसून येतील दोन्ही देशांच्या लष्कराने सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी ढवळा ढवळ करत भारतालाच बालिश प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. कुरेशी यांनी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना भारत लडाखमध्ये सर्जिकल स्ट्राइक का करत नाही? असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान शाह महमूद कुरेशी म्हणाले की, मी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना हे स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की जर पाकिस्तानवर हल्ला करण्याची चूक भारताने केली तर आम्ही देखील त्याला त्याचपद्धतीने उत्तर देऊ. भारताने हल्ला केल्यास त्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सोमवारी शाह महमूद कुरेशी म्हणाले की, भारताने फक्त धमक्या देणे थांबवावे. अमित शहा यांचे विधान बेजबाबदार असून जगानेही ते पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

ओडिशा जनसंवाद रॅलीला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमाभागात तणाव निर्माण करणाऱ्या चीन आणि पाकिस्तान या राष्ट्रांना भारतीय सीमाभागात अतिक्रमण करणे म्हणजे काही पोरखेळ नाही, अशा कडक शब्दांत एक प्रकारे थेट इशाराच दिला आहे.

त्यानंतर जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार शाह महमूद कुरेशी यांनी असेही म्हटले आहे की, भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइकची चूक करू नये, कारण स्वतःचे संरक्षण कसे करावे हे इस्लामाबादला माहीत आहे. पाकिस्तान नेहमीच शांततेबद्दल बोलतो. पण निरपराध लोकांच्या जीवाशी भारत खेळत आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात असलेल्या सरकारवर अल्पसंख्यांक असमाधानी असल्याचे शाह महमूद कुरेशी म्हणाले. त्याचबरोबर, भारतातील सत्ताधारी भाजपा आपले अपयश लपविण्यासाठी पाकिस्तानला दोष देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही शाह महमूद कुरेशी यांनी केला आहे.

भारताची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. भारताचा काश्मीरमधील अत्याचार शिगेला पोहोचला आहे. भारत अफगाण शांतता चर्चेलाही नुकसान करु पाहत असल्याचे शाह महमूद कुरेशी म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सीमेवर चीनने आपल्या हालचाली वाढविल्या होत्या. मात्र, आता यावर भारत-चीन संवादाद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Leave a Comment