जिओचा कौल कुणाला? मायक्रोसोफ्ट की गुगलला?

फोटो साभार बिझिनेस इनसायडर

जागतिक लॉकडाऊन काळात अनेक बडे उद्योगव्यवसाय नुकसानीचे हिशेब करू लागले असताना रिलायंस जिओने कल्पनेपलीकडे उत्तम कामगिरी बजावली आहे. गेल्या सात आठवड्याच्या काळात कंपनीने तब्बल ८ गुंतवणूकदारांकडून १ लाख कोटींची गुंतवणूक मिळविली आहे. नववा गुंतवणूकदार सौदीतून येत आहेच. आणि विशेष म्हणजे जगातील दोन बड्या टेक कंपन्या जिओ मध्ये गुंतवणुकीच्या प्रतीक्षेत असून त्यातील कुणाला जिओ कौल देणार याची उत्सुकता वाढली आहे.

बिझिनेस इनसायडरमधील बातमीनुसार गुगल आणि मायक्रोसोफ्ट या दोन बड्या कंपन्या जिओ मध्ये हिस्सेदारी घेण्यासाठी उत्सुक आहेत. जिओचा हा शेवटचा गुंतवणूक करार असेल असे सांगितले जात असून जिओ गुगलशी हातमिळवणी करणार की मायक्रोसोफ्टशी असा प्रश्न आहे. या दोघांपैकी एकाचीच निवड जिओला करावी लागणार आहे.

गुगल आणि मायक्रोसोफ्ट जिओ मध्ये ६ टक्के हिस्सा मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. फेसबुकने जिओ मध्ये गुंतवणूक केल्यापासूनचा गुगल जिओ मध्ये गुंतवणूकीसाठी उत्सुक आहे. फेसबुकने जिओ मध्ये ९.९९ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. गुगलने व्होडाफोन मध्ये छोटा हिस्सा नुकताच खरेदी केला आहे. तर जिओ मध्ये फेसबुक, सिल्व्हर लेक, विस्टा, जनरल अॅटलांटिक, केकेआर, मुबाडला यांनी गुंतवणूक केली आहे. जिओने २१ टक्के हिस्सा विकला असून जिओ प्लॅटफॉर्मची इक्विटी व्हॅल्यु ४.९१ लाख कोटी तर एन्टरप्राईज व्हॅल्यु ५.१६ लाख कोटींवर गेली आहे.

Leave a Comment