यंदा पावसाळी पिकनिक नाहीच; भुशी डॅमसह इतर पर्यटनस्थळांवर बंदी कायम


पुणे : आजपासून देशभरातील अनेक राज्यांमधील नॉन कंटेन्मेंट झोनमधील धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होत आहेत. त्यातच आजपासून महाराष्ट्रातील मिशन बिगिन अगेनच्या 3 टप्प्याला देखील सुरुवात होणार आहे. 10 टक्के कर्मचारी क्षमतेने खासगी कार्यालये सुरु होणार आहेत. तर इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारने परवानगी दिलेल्या इतर नागरिकांसाठी मुंबईत बेस्ट सुविधा सुरु होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील मंडई आजपासून सुरु होणार आहेत. परंतु राज्यात धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल आणि रेस्टॉरंट उघडण्यास अद्याप परवानगी नाही.

तर दूसरीकडे पावसाळा सुरु झाल्यामुळे पर्यटन केंद्र पर्यटकांना खुणावू लागली आहेत. एव्हाना पुणे-मुंबईतील पर्यटकांनी तर त्यांच्या आवडत्या ठिकाणी पिकनिकचे नियोजन देखील सुरु केले असेल. किंबहुना सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इतर धरणांचे पर्याय ते अवलंबण्याच्या तयारीत असतील. पण त्यांचा यंदा हिरमोड होणार आहे. कारण लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता येत असली तरी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवण्याचा निर्णय पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दिले आहेत.

पावसाळा सुरु झाला की सह्याद्रीच्या पर्वत रांगातील निसर्ग आणखी बहरुन जातो. मग पर्यटकांचे पाय आपसूक या निसर्गरम्या ठिकाणांकडे खेचले जातात. याच पर्वत रांगात वसलेला लोणावळा हे तर पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्रच आहे. तेथे आलेला प्रत्येकजण पर्यटक भुशी धरणाच्या पायऱ्यांवरुन वाहणाऱ्या खळखळत्या पाण्यात उतरला नाही तरच आश्चर्यच म्हणावे लागेल. पण तूर्तास जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशानुसार या सह्याद्रीच्या पर्वत रांगात वर्षाविहार करता येणार नाही.

केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्नशील आहेत. पण सरकारने सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी निर्बंध कायम राखले आहे. त्याचाच भाग म्हणून पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी कायम ठेवली आहे.

पुण्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस होतो. मावळ तालुक्यातील भुशी धरण, लोणावळ्यातील विविध पॉईंट्स, गड-किल्ले, लेण्याद्री, मुळशी तालुक्यातील मुळशी धरण आणि ताम्हिणी घाट परिसर, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण आणि गड-किल्ले परिसर, तर वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण आणि परिसरात वर्षापर्यटनासाठी मोठी गर्दी होते. या धरणांना मुंबई, पुण्यासह बहुतांश जिल्हयातील पर्यटकांची पर्यटनासाठी पसंती असते. प्रत्येक वीकएण्ड आणि सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुण्यासह बहुतांश जिल्ह्यातील पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळते.

या धरण आणि इतर भागात नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे पाण्यात बुडून तसेच पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मयत होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. अशातच दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुढील आदेशापर्यंत पर्यटनाला बंदी कायम ठेवली आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार दंडनिहाय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

Leave a Comment