दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात बोर्डाच्या अध्यक्षांची महत्वपूर्ण माहिती


पुणे -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आधीच झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल कधी लागणार याची पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. हे निकाल दरवर्षी सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरूवातीला जाहिर होतात. पण यंदा लॉकडाउनमध्ये दहावी-बारावीचे निकाल अडकला आहे. दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात गेल्या आठवडाभरापासून प्रसारमाध्यमांत आणि सोशल मीडियावर निकालासंदर्भात बातम्या प्रकाशित होत आहेत. राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी त्यावर आता स्पष्टीकरण दिले आहे.

सध्या राज्यातील दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकाल तयार करण्याचे काम सुरू असून अद्यापपर्यंत तरी निकालाची तारीख ठरलेली नसल्यामुळे निकालाच्या कोणत्याही तारखांवर विद्यार्थी पालकांनी विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदा दहावी-बारावीचा निकाल कोरोनामुळे अद्यापपर्यंत जाहीर करता आलेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निकाल जाहीर होण्यास थोडा उशीर होणार आहे. पण सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखांची चर्चा सुरू आहे. राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी या पार्श्वभूमीवर निकालाची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे स्पष्ट केले.

Leave a Comment