तब्बल 74 दिवस विमानतळावर अडकला होता फुटबॉलपटू, आदित्य ठाकरेंनी अशी केली मदत

2004 साली आलेल्या हॉलिवूड चित्रपट द टर्मिनलमध्ये अभिनेता टॉम हँक्स जॉन कॅनेडी विमानतळावर अनेक दिवस अडकतो. त्याला अमेरिकेत देखील प्रवेश मिळत नाही व त्याच्या देशात देखील परतू शकत नाही. अशीच काहीशी घटना घानाचा फुटबॉलपटू रँडी जुआन मुलरसोबत लॉकडाऊन दरम्यान घडली आहे.

मुलर तब्बल 74 दिवस मुंबई विमानतळावर अडकला होता. आता महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मदतीने त्याच्या राहण्याची सोय एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. आता तो खरी जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची वाट पाहत आहे. मुलरने या मदतीसाठी  आदित्य ठाकरे आणि युवा सेना पदाधिकारी राहुल कनाल यांचे आभार मानले आहेत.

मुलर केरळच्या एका क्लबसाठी खेळण्यास भारतात आला होता. त्याला केनिया एअरवेज विमानाने घरी परतायचे होते. मात्र लॉकडाऊन लागू झाला व तो मुंबई विमानतळावर अडकला. कनाल यांनी सांगितले की, मुलरने मला सांगितले की, विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी त्याची खूप मदत केली. तो विमानतळावरी कृत्रिम उद्यानात वेळ घालवत असे. स्टॉलवरून जेवण खरेदी करत असे. विमानतळावरील कर्मचाऱ्यांसोबत वेळ घालवत असे.

जेव्हा मुलरकडील पैसे संपले तेव्हा विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी त्याची मदत केली. विमानतळ स्टाफ त्याला जेवणासाठी समोसा आणि चटणी देत असे. अनेक प्रवाशांनी त्याला पुस्तके देखील दिली. मुलर ही पुस्तके वाचून वेळ घालवत असे. या दरम्यान एक ट्विटर युजरने त्याची स्थिती पाहून आदित ठाकरेंना ते लक्षात आणून दिले. यानंतर कनाल यांनी त्याला मदत केली.

Leave a Comment