माजी पंतप्रधान लढवणार राज्यसभेची निवडणूक


बंगळुरू: राज्यसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी घेतला असून उद्या मंगळवारी ते आपला निवडणूक अर्ज भरणार आहेत. त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याची सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केल्यानंतर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची माहिती त्यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली. त्यांना राज्यसभेचा अर्ज दाखल करण्याचा अन्यही राष्ट्रीय नेत्यांनी आग्रह धरला, पण यासाठी ते स्वतः उत्सुक नव्हते, त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा या नेत्यांच्या आग्रहामुळे निर्णय घेतल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले.

या आधीही एकदा 87 वर्षीय देवेगौडा हे राज्यसभेचे सदस्य होते. तेथील ही त्यांची दुसरी टर्म असणार आहे. 1996 साली ते देशाचे पंतप्रधान होते. त्यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 13 हजार मतांनी पराभव झाला होता. आता राज्यसभा निवडणुकीसाठी ते काँग्रेस व जेडीएस आघाडीचे संयुक्‍त उमेदवार असणार आहेत. कर्नाटकात येत्या 19 जूनला राज्यसभेच्या चार जागांसाठी ही निवडणूक होत आहे. काँग्रेसकडे या विधानसभेत 68 आमदार असून त्यांना एक जागा सहज जिंकता येणार आहे. त्यांनी त्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांना उमेदवारी दिली आहे. जादाची मते देवेगौडा यांना दिली जातील त्यातून त्यांचाही विजय सहज होऊ शकेल. ही निवडणूक जिंकण्यासाठी 44 आमदारांची गरज आहे.

Leave a Comment