फडणवीसांनी सोनू सूद प्रकरणावरुन मानले शिवसेनेचे आभार - Majha Paper

फडणवीसांनी सोनू सूद प्रकरणावरुन मानले शिवसेनेचे आभार


मुंबई – अभिनेता सोनू सूदवर टीका करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपशी संबंध जोडल्यानंतर राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेला अद्यापही असा विश्वास आहे की, चांगली कामे करणारे भाजपमध्येच आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. भाजपकडून निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणासाठी ट्रकमधून मदत पाठवण्यात आली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.

कोणीही चांगले काम केले तर त्या कामाचे कौतुक झालेच पाहिजे. सोनू सूद यांनी चांगले काम केल्याबरोबर ते भाजपचे असल्याचे सांगितले गेले. म्हणजे अद्यापही शिवसेनेला असा ठाम विश्वास आहे की चांगली काम करणारी मंडळी ही भाजपमध्येच आहेत. याचा आम्हाला आनंद आहे आणि त्यांचा आभारी आहे. पण कोणताही अन्याय सोनू सूद यांच्यावर होऊ नये म्हणून सांगतो, स्वतःच्या हिंमतीवर त्यांनी एक चांगले समाजकार्य केले आहे. त्या कामाचे कौतुक झाले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवारचे आम्ही जेव्हा काम करत होतो, तेव्हा नाम संस्था आणि आमिर खान मदत करायचे. त्यावेळी आम्ही हेवेदावे केले नाही. सरकारला ते एकप्रकारे मदतच करत होते. आम्ही त्यांचे कौतुकच केले. जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे आणि त्यांना मदतही केली पाहिजे. असे काम करणाऱ्यांना त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा बाबतीत राजकारण करणे हे अत्यंत चुकीचे आहे.

Leave a Comment