दिल्लीचे मुख्यमंत्री तब्येत बिघडल्याने विलगीकरणात


नवी दिल्ली – देशाला कोरोनाचा विळखा पडलेला असतानाच या जीवघेण्यामुळे सर्वसामान्यांपासून सगळ्यांनाच आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना थोडासा ताप जाणवत असून खोकलाही झाल्यामुळे त्यांनी स्वतःलाच घरात विलगीकरण केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी आहे.

केजरीवाल यांनी स्वत:ला क्वॉरंटाईन केल्यामुळे त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केजरीवाल यांनी राजधानीतील खाजगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी राज्य सरकार आणि काही खासगी मालकीची रुग्णालये केवळ दिल्लीतील नागरिकांच्या उपचारासाठी उपलब्ध राहतील अशी घोषणा केली होती. दिल्लीतील खासगी रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेवरून काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता.

दरम्यान राज्याच्या सर्व सीमा खुल्या करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. दिल्लीत अन्य राज्यातील रुग्ण हे उपचारासाठी येतील या भीतीने सुरुवातीला सीमाबंदीचा निर्णय घेण्यात आला. दिल्लीत राज्य सरकारच्या मालकीच्या रुग्णालयातील दहा हजार खाटा स्थानिकांसाठी राखून ठेवल्या जाणार आहेत. केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये मात्र सर्वांना उपचार घेता येतील.

राजधानीत जून महिन्याच्या अखेरीपर्यंत पंधरा हजार खाटांची आवश्यकता भासेल. सध्या आमच्याकडे नऊ हजार बेड असून अन्य राज्यांना त्यांचा वापर करण्याची परवानगी दिल्यास ते देखील आमच्या हातून जाऊ शकतात, अशी भीती केजरीवाल यांनी व्यक्त केली होती. हॉस्पिटल्सच्या मनमानीला चाप लावण्यासाठी दिल्ली सरकारतर्फे काही दिवसांपूर्वी अॅप लाँच करण्यात आलं होतं. मात्र अॅपवर हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध असतात, प्रत्यक्षात मात्र बेड उपलब्ध नाही असं सांगण्यात येतं असा आरोप काही नेटिझन्सनी सोशल मीडियावर केला होता.

Leave a Comment