पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून चिनी वस्तूंची होळी


पुणे : आज पुण्यातील सावरकर स्मारक या ठिकाणी ब्राह्मण महासंघाने चिनी वस्तूंची होळी करुन चीनचा निषेध केला. तसेच कोरोनाचा प्रसार चीनने जाणूनबूजून केल्याचा आरोप केला. दरम्यान संभाजी ब्रिगेडने यावर प्रतिक्रिया देताना हा महासंघाचा स्टंट असल्याची टीका केली. तसेच ब्राह्मण महासंघाने आधी हातातील चीनचे मोबाईल आणि घरातील सामान जाळावे, असा खोचक सल्ला दिल्यामुळे आता चीनच्या वस्तूंचा बहिष्कार टाकण्यावरुन पुण्यात दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले.

चिनी विदेशी वस्तूंची होळी करत वस्तू फोडून ब्राह्मण महासंघाने सावरकर स्मारक या ठिकाणी चीनचा निषेध केला. ब्राह्मण महासंघाने यावेळी चीनने कोरोनाचा प्रसार जाणूनबूजून केला असल्याचा आरोपही केला आहे. याच ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विदेशी वस्तूंची होळी केली होती. चीनी वस्तूंच्या वापरावर बंदी घालणार असल्याचा निर्धार यावेळी ब्राह्मण महासंघाने व्यक्त केला. हे आंदोलन ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. अनेक चिनी वस्तूंची तोडफोड यावेळी करण्यात आली.

चिनी वस्तूंची तोडफोड करत ब्राह्मण महासंघाने केलेल्या आंदोलनावर संभाजी ब्रिगेडने सडकून टीका केली आहे. ब्राह्मण महासंघाचे हे आंदोलन केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. ब्राह्मण महासंघाला जर खरोखर चिनी वस्तूंच्या विरोधात आंदोलन करायचे असेल, तर त्यांनी आधी आपल्या हातातील चिनी मोबाईल, चिनी अॅप, घरातील पुजेचे चिनी साहित्य, घरातील टिव्ही, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जाळावे, असा खोचक सल्ला संभाजी ब्रिगेडने दिला. तसेच सध्या कोरोना निदानासाठी वापरण्यात येणारे इन्फ्रा रे तापमापक, केंद्राने मागवलेल्या पीपीई किट हे देखील चिनी असल्याचेही सांगत संभाजी ब्रिगेडने टोला लगावला.

आपल्या भूमिकेत संभाजी ब्रिगेडने म्हटले की, लोकांची ब्राह्मण महासंघाने दिशाभूल करु नये. तुम्ही चीनशिवाय जगूच शकत नाही. कारण कमी किमतीत वस्तू खरेदी करायची सगळ्यांना सवय लागली आहे. तुमच्या घरात चीन घुसलेला आहे. तुमच्या घरातील सर्व वस्तू तपासा, त्या चीनच्या निघतील. केंद्र सरकारने सर्वप्रथम चीन सोबतचे सर्व व्यवहार बंद करावेत. भारतीय सैनिकांचे बुलेट-प्रुफ जॅकेट, चिनी अॅप, वस्तू आणि व्यवहार सर्वप्रथम बंद करावा. पण हे सरकार असे करणार नाही.

Leave a Comment