चीनने भारताला पुन्हा डिवचले; भारतीय चीनी वस्तूंवर बहिष्कार घालूच शकत नाही


नवी दिल्ली – सध्या सीमावादावरुन असलेल्या परिस्थितीत चीनकडून पूर्व लडाखमध्ये एलएसीवर तणाव कमी करण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी पुन्हा एकदा भारतावर चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने निशाणा साधला आहे. ग्लोबल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या एका लेखातून भारतातील काही लोकांमुळे चीन विरोधी भावना निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चीनविरोधात सामान्य भारतीयांना भडकवण्याची आणि चीनची प्रतिमा डागाळण्याचा जाणूबूजून प्रयत्न केला जात आहे. सामान्य भारतीयांच्या जीवनात चीनची उत्पादने अविभाज्य भाग बनले आहेत आणि ते हटवणे कठिण आहे. भारतातील चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल, असे ग्लोबल टाईम्सने आपल्या लेखात म्हटले आहे. भारतात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तू वापरण्याची मोहीम सध्या सुरू करण्यात आली आहे.


सोनम वांगचूक यांचादेखील उल्लेख ग्लोबल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या लेखात करण्यात आला आहे. युट्यूबवर एक व्हिडीओ टाकत त्यांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची विनंती केली होती. सामान्य भारतीयांना चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी सोनम वांगचूक यांच्यासारख्या व्यक्ती प्रवृत्त करत असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. भारत आणि चीनदरम्यान सीमेवर असलेला तणाव हा गंभीर नाही आणि दोन्ही देश यावर चर्चा करत आहेत. परंतु काही भारतीय माध्यमे आणि काही भारतीय चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शँघाय इंस्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे झाओ जेनचेंग यांनी या लेखात म्हटले आहे.

ग्लोबल टाईम्सने यापूर्वी एक ट्विटही केले होते. एका छोट्या समुहाकडे भारतात रणनीती तयार करण्याचं आणि धोरणं ठरवण्याचा अधिकार आहे. चीनविरोधातील नकारात्मक विचारांनी तो समूह भरलेला आहे. चीनची प्रगती तसेच बीजिंग आणि नवी दिल्ली यांच्यातील वाढती दरी यामुळे चीनविषयीचा भारताचा संभ्रम वाढत असल्याचे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. ग्लोबल टाईम्सने भारत चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्ध सरावाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. तसेच सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये चीनने भारत आणि चीनदरम्यान असलेले संबंध सामान्य झाल्याचा दावा केला होता. तर दुसरीकेडे त्यांचे लष्कर सीमेवर गस्त घालताना दिसले होते. ग्लोबल टाईम्सने तेव्हा युद्ध सरावाचे फोटो शेअर करून सीमेवर तणावाचे वातावरण असल्याचे म्हटले होते.

Leave a Comment