कॅरी मिनाटी ठरला सर्वाधिक स्बस्क्राइबर्स असणारा भारतीय युट्यूबर

लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटीच्या युट्यूब स्बस्क्राइबर्सचा आकडा 21.1 मिलियनच्या पुढे गेला आहे. (2 कोटी 10 लाख) यासोबतच तो सर्वाधिक स्बस्क्राइबर्स असणारा भारतीय युट्यूबर ठरला आहे. त्याने व्यक्तीगत युट्यूबर अमित भडानाला मागे टाकले आहे. मागील 6 दिवसात कॅरीच्या स्बस्क्राइबर्सची संख्या 10 लाखांनी वाढली आहे. त्याचे नवीन रॅप साँग यलगार आल्यानंतर एका दिवसात तब्बल 5 लाख स्बस्क्राइबर्स वाढले आहेत.

कॅरी मिनाटी अर्थात अजय नागर मागील काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. त्याने 5 मे ला ‘YouTube vs TikTok: The End’ नावाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने टीकटॉक युजर्सची जोरदार खिल्ली उडवली होती. मात्र गाईडलाईन्सचे पालन न केल्यामुळे हा व्हिडीओ युट्यूबने हटवला होता. या व्हिडीओने सर्वात जलद 10 लाख, 20 लाख आणि 50 लाख लाईक्सचा विक्रम केला होता.

यानंतर कॅरीने नुकताच यलगार नावाने एक नवीन व्हिडीओ शेअर केला असून, या व्हिडीओला 24 तासांच्या आत 4 कोटींपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत देखील 90 लाख लोकांनी लाईक्स केले असून, 10 लाखांपेक्षा अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.