पाकमधील प्रसिद्ध वर्तमानपत्राकडून योगी आदित्यनाथ यांचे कौतूक


नवी दिल्ली – अनपेक्षितरित्या आपला कट्टर वैरी असलेल्या पाकिस्तानातून चक्क उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक झाले आहे. कोरोना व्हायरसची उत्तर प्रदेश सारख्या मोठया राज्यामध्ये परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली, त्याबद्दल पाकिस्तानी मीडियामधून योगींची प्रशंसा करण्यात आली आहे. योगी यांच्यावर पाकिस्तानातील प्रसिद्ध अशा ‘डॉन’ या वर्तमानपत्राचे संपादक फहद हुसैन यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.

पाकिस्तानला कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसा संघर्ष करावा लागत आहे, आपल्या लेखातून इम्रान खान सरकारवर त्याबद्दल फहद हुसैन यांनी शनिवारी टिका केल्यानंतर पाकिस्तानची उत्तर प्रदेश बरोबर तुलना करणारे एक ट्विट त्यांनी केले. फहद हुसैन हे डॉनच्या इस्लामाबाद आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.

पाकिस्तान आणि उत्तर प्रदेश यांच्या कोरोना व्हायरसच्या हाताळणीमधला फरक दाखवून देणारा एक आलेख रविवारी सकाळी फहद हुसैन यांनी ट्विट केला. त्यांनी आपल्या ट्विटमधून लॉकडाउनचे कठोरतेने पालन योगींच्या राज्यात झाल्यामुळे तिथे पाकिस्तानपेक्षा मृत्यूदर कसा कमी आहे ते दाखवून दिले. फहद हुसैन यांच्यानुसार पाकिस्तान आणि उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळपास समान आहे. पण उत्तर प्रदेशपेक्षा सातपट जास्त पाकिस्तानातील मृत्यूदर असल्याचे त्यांनी दाखवून दिले. लॉकडाउनचे कठोरतेने पालन योगींच्या राज्यात झाल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment