तुकाराम मुंढे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल


नागपूर : कोरोना या जीवघेण्या व्हायरसचा राज्यात शिरकाव झाल्यानंतर अनेकदा नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी केलेल्या कठोर उपाययोजनांमुळे चर्चेत आले होते. पण त्यांच्या याच निर्णयांमुळे त्यांच्यावर काही जणांकडून टीका करण्यात आली. त्यातच आता आणखी एका कारणासाठी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण त्यांच्याविरोधात आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि खासगी कार्यक्रम, सभा-संमेलनांवर केंद्र तसेच राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे बंदी घातली असतानाच तुकाराम मुंढे यांनी सुमारे 200 लोकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिसांकडे एका नागरिकाने तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत सहायक पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरू केली असल्याची माहिती आहे.

तक्रारकर्त्याचे नाव मनीष मेश्राम रा.सिरसपेठ असे असून त्यांनी या तक्रारीत एक व्हिडिओ देखील दिला आहे. त्यानुसार, आयुक्त तुकाराम मुंढे हे येथील हॉटेल रजवाडा पॅलेसमधील सभागृहात 31 मे 2020 ला आयोजित कार्यक्रमात 200 लोकांच्या उपस्थितीत मंचावरुन संबोधन करताना दिसून येत असल्याचे म्हटले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या नियमांचे कुठल्याही प्रकारे पालन करण्यात आले नसल्याचे मेश्राम यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे हॉटेल राजवाडा , असो की कार्यक्रमाला परमिशन देणारे अधिकारी किंवा कार्यक्रमाचे आयोजन करणारे आयोजक, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मनीष मेश्राम यांनी तक्रारीतून केली आहे.

Leave a Comment