श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये ३७ बालकांचा जन्म, नवजात बालकांची नावे देखील अजबच


मुंबई : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारा मजूर अडचणीत सापडला होता. त्याचबरोबर पोटाची खळगी भरण्यासाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये हा मजूर अडकून पडला होता. अशा मजूर वर्गाला दिलासा देत लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केली. पण या श्रमिक स्पेशल ट्रेनने प्रवासा दरम्यान ३६ बालकांचा जन्म झाल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान जन्मलेल्या मुलांची पालकांनी नावे देखील खूप मनोरंजक ठेवली आहेत. आपल्या मुलीचे नाव कोणी करुणा ठेवले आहे तर कोणी लॉकडाऊन असे ठेवले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना छत्तीसगडच्या धरमपुरा येथे राहणाऱ्या करुणाचे वडील राजेंद्र यादव यांनी सांगितले की, आपल्या मुलीचे नाव त्यांनी करुणा ठेवले आहे. करुणा म्हणजे दया. ते म्हणाले की, कोरोना हे नाव अनेकांनी मला सूचवले. पण लोकांचा जीव ज्या व्हायरसमुळे जात आहे ते नाव मी कसे देऊ?. जेव्हा देश कोरोनाशी लढत आहे त्या दरम्यान करुणाचा जन्म झाला.

मुंबईहून उत्तर प्रदेशकडे श्रमिक स्पेशल ट्रेनने जाणाऱ्या रिना यांनी देखील आपल्या मुलाचे नाव लॉकडाउन ठेवले आहे. जेणेकरून ज्या वेळी त्याने जन्म घेतला त्या कठीण काळाची आठवण कायम राहील. त्या म्हणाल्या की, एका अत्यंत कठीण परिस्थितीत त्याचा जन्म झाला. म्हणून आम्ही त्याचे नाव लॉकडाऊन ठेवले आहे.

ममता यादव ही आणखी एक महिला आहे जी आठ मे रोजी जामनगर-मुजफ्फरपूर श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये चढली. बिहारच्या छपरा जिल्ह्यात जेव्हा तिने मुलाला जन्म दिला तेव्हा तिची आई तिच्याबरोबर असावी अशी तिची इच्छा होती. पण डेस्टिनेशन स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी तिने आपल्या मुलाला हातात घेतले. ममताच्या डिलिव्हरी वेळी इतर प्रवासी डब्यातून बाहेर निघून गेले आणि डब्याचे रुपांतर एका डिलिव्हरी रूममध्ये करण्यात आले होते. अशा अनेक मातांना डॉक्टर आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत केली. या विशेष गाड्यांमध्ये बऱ्याच गर्भवती महिलांनी प्रवासादरम्यान इतर प्रवाशांच्या मदतीने बाळांना जन्म दिला.

Leave a Comment