पुण्यात मेट्रोचे काम करणाऱ्या 17 कामगारांना कोरोनाची लागण


पुणे : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच आता पुण्यात मेट्रोचे काम करणाऱ्या 17 कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. येरवडा परिसरातील लेबर कॅम्पमधील हे सर्व कामगार असल्यामुळे पुण्यात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.

लॉकडाऊनच्या काळात पुण्यातील अनेक कामगार आपल्या स्वगृही परतल्यामुळे सद्यस्थितीत पुणे मेट्रोचे केवळ 20 ते 30 टक्के काम सुरु आहे. याच मेट्रोचे काम करणाऱ्या एका ठेकदाराकडील 17 कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व जण येरवडा परिसरातील लेबर कॅम्पमध्ये राहतात. मेट्रोचे या कॅम्पमधील 69 कामगार काम करतात. त्यातील 17 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ही बाधा झाल्याचे मेट्रो कामादरम्यान नियमित तपासणी सुरु असताना स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित 49 कामगारांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दरम्यान सध्या वेगवेगळ्या कॅम्पमध्ये 88 कामगार काम करत आहे.

दरम्यान योग्य त्या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांना प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून आणखी दक्षता घेतली जाणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे. महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात 3007 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने एकूण आकडा 85 हजार 975 वर गेला आहे. यापैकी 39 हजार 314 रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या राज्यात 43 हजार 591 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Leave a Comment