अनलॉक १ मध्ये फिटनेस फ्रिककडून सायकलींना मोठी मागणी

फोटो साभार  जस्ट डायल

लॉकडाऊन संपून आता अनलॉक १ फेज देशात सुरु झाली असताना फिटनेस फ्रिक नागरिकांकडून सायकलना मोठी मागणी येत असल्याचे दिसून आले आहे. देशातील सर्वात मोठे सायकल मार्केट दिल्ली मध्ये झंडेवालान मार्केट हे आहे. लॉक डाऊन उठविले गेल्यापासून या बाजारात सायकल साठी ग्राहकांची वर्दळ सुरु झाली आहे. लॉक डाऊन काळात जिम, पार्क बंद होते त्यामुळे नागरिकांना व्यायाम करणे अवघड बनले होते. आता ही परिस्थिती लक्षात घेऊन नागरिक सायकल खरेदीला अधिक प्राधान्य देऊ लागल्याचे दिसून येत आहे. हरियाना मधील अॅॅटलस सायकल कारखाना जागतिक सायकल दिवशीच ले ऑफ मध्ये गेल्याचे नुकतेच जाहीर झाले असून त्या पार्श्वभूमीवर सायकलना वाढती मागणी ही आशादायक बाब असल्याचे समजले जात आहे.

विशेष म्हणजे सायकल खरेदीदारात तरुण किंवा विद्यार्थी ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. हे मार्केट १ जून पासून सुरु झाले असून आत्तापर्यंत सायकल विक्रीत २५ टक्के वाढ दिसून आली आहे. लॉक डाऊन पूर्वी ज्या दुकानातून साधारण ५० हजार सायकल्स विक्री होत तेथे हा आकडा आता ७० हजारावर गेल्याचे समजते. त्यातही मोठ्या सायकलींना जास्त मागणी आहे.

या बाजारात गिअरवाल्या सायकलीही उपलब्ध आहेत. सायकलींच्या किमती प्रकारानुसार ३ हजारपासून ३० हजारापर्यंत आहेत. मात्र सायकल विक्रीत मार्जिन कमी असल्याने एके काळी या मार्केट मध्ये असलेल्या १३२ दुकानांपैकी फक्त ३० दुकाने सध्या सुरु आहेत. बाकी दुकानदरांनी सुटे भाग विक्री सुरु केली आहे.

सायकल खरेदीमागे पेट्रोल डिझेलची गरज नाही, सहज परवडणारी किंमत, जागा कमी लागणे, कुठेही जाण्यायेण्यास सोयीची आणि शिवाय शरीराला व्यायाम अशी अनेक कारणे आहेत. या मार्केट मध्ये लुधियाना येथून सायकल्स येतात तर हिरो, हर्क्युलस सायकली मुंबई मधून येतात असे समजते.

Leave a Comment