देशभरातील कोट्यावधी विद्यार्थी आणि पालकांना पडलेल्या प्रश्नाला केंद्रीय मंत्र्यांचे उत्तर


नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या २५ तारखेपासून सुरु असणाऱ्या लॉकडाउनचा एक जूनपासून पाचवा टप्पा सुरु झाला आहे. अनेक सेवा या पाचव्या टप्प्यामध्ये पुन्हा सुरु करण्यासंदर्भात काही अटी आणि शर्थी ठेवत परवानगी देण्यात आली आहे. तर देशभरातील हॉटेल, मॉल, धार्मिक स्थळे आठ जूनपासून टप्प्याटप्प्यांमध्ये सुरु करण्यासंदर्भातील सूचना केंद्र सरकारने जारी केल्या आहेत. असे असतानाच देशभरातील कोट्यावधी विद्यार्थी आणि पालकांना मात्र शाळा आणि महाविद्यालये कधी सुरु होणार यासंदर्भात अद्यापही संभ्रमावस्थेत आहेत. पण काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी शाळा कधी सुरु होणार यासंदर्भातील संकेत दिले आहेत.

तीन जून रोजी बीबीसीला निशंक यांनी विशेष मुलाखत दिली. शाळा आणि महाविद्यालयांसंदर्भातील प्रश्न निशंक यांना या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावेळी ऑगस्ट महिन्यानंतर पुन्हा शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार असल्याचे सांगितले. मे महिन्यामध्ये समोर आलेल्या काही वृत्तानुसार जुलै महिन्यामध्ये ३० टक्के हजेरीसहीत देशभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरु होती. इयत्ता आठवीपासून पुढील वर्ग हे ३० टक्के हजेरीसहीत सुरु करण्यात येतील अशी चर्चा होती. सुरुवातीला ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील शाळा सुरु होतील. तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन सत्रांमध्ये वर्ग भरवले जातील अशा देखील चर्चा सुरु असतानाच या चर्चांना निशंक यांनी पूर्वविराम दिला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच पत्रक जारी करुन एवढ्यात शाळा सुरु होणार नसल्यासंदर्भातील माहिती दिली होती.

एकीकडे इतर सेवा टप्प्या टप्प्यामध्ये सुरु होत असतानाच विद्यार्थी आणि पालकांमधील संभ्रम कायम आहे. निशंक यांनी यावरच पडदा टाकताना शाळा आणि महाविद्यालये ऑगस्ट महिन्यामध्ये त्यातही १५ ऑगस्टनंतरच सुरु होणार असल्याची माहिती दिली आहे. १५ ऑगस्टपर्यंत सध्या घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांचे निकाल लावण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान ज्या परीक्षा झाल्या आहेत आणि ज्या होणार आहेत त्यांचाही निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती निशंक यांनी दिली. त्यानंतर शाळा आणि महाविद्यालये १५ ऑगस्टनंतर सुरु होणार असेच म्हणता येईल का असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्या महिलेने निशंक यांना विचारला. त्यावर निशंक यांनी त्यावर ‘अर्थात’ असे उत्तर दिले.

१ जुलै ते १५ जुलै या दरम्यान सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा होणार असून १ जुलै ते १२ जुलैदरम्यान आयसीएससी आणि आयएससी बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत. याचबरोबर ‘नेट’ची परीक्षा २६ जुलै रोजी तर ‘जेईई’ची परीक्षा १८ जुलै ते २३ जुलै दरम्यान होणार आहे. शाळा आणि विद्यापीठे सुरु करण्याआधी विद्यापीठ अनुदान आयोग हे विद्यापिठांमधील नव्या नियमांसंदर्भात तर राष्ट्रीय शिक्षा संशोधन, तसेच प्रशिक्षण संस्था (एनसीईआरटी) शाळामधील नव्या नियमांसंदर्भातील मार्गदर्शक तत्वांवर काम करत असून लवकरच यासंदर्भात घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.

Leave a Comment