दिल्लीकरांची दारु झाली स्वस्त! सरकारने हटवला ‘स्पेशल कोरोना टॅक्स’


नवी दिल्ली: कोरोनामुळे देशभरातील विविध राज्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. याच काळात अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे राज्य सरकारांना मिळणार महसूल बंद झाला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्राने मद्यविक्रीला परवानगी दिली होती. ज्यामुळे राज्यांना महसूल मिळवण्यात थोडीफार मदत होईल. पण त्याचवेळी काही राज्यांनी दारुवर स्पेशल कोरोना टॅक्स लावला होता. दिल्ली हे अशाप्रकारचा टॅक्स लावणारे देशातील पहिले राज्य होते. पण आता याच दिल्लीमध्ये दारु स्वस्त होणार आहे. कारण आता सर्व प्रकारच्या दारूच्या ब्रँडवर लावण्यात आलेला स्पेशल कोरोना टॅक्स केजरीवाल सरकारने मागे घेतला आहे. यापूर्वी सर्व ब्रॅण्डच्या दारूच्या किंमतीवर दिल्ली सरकारने ७० टक्क्यांपर्यंत स्पेशल कोरोना टॅक्स लावला होता, त्यामुळे राजधानीत दारूचे दर वाढले होते.

दिल्ली सरकारने यापूर्वी ५ मे रोजी सर्व ब्रॅण्डच्या दारूच्या किंमतीवर (एमआरपी) ७० टक्के स्पेशल कोरोना टॅक्स लावला होता. दारूच्या किंमती वाढल्याबद्दल दिल्ली सरकारलाही टीकेचाही सामना करावा लागला होता. तसेच या प्रकरणाला दिल्ली उच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले होते. दिल्ली सरकारने नुकतेच सांगितले होते की, सर्व ब्रॅण्डच्या दारूवर लावलेल्या कोरोना टॅक्समुळे २४ दिवसांत १६१ कोटींची कमाई झाली होती. दिल्लीत ४ मे ते ३० मे या कालावधीत २३४ कोटी दारु विक्री झाली. तर ७ मे आणि २५ मे रोजी ड्राय डेमुळे दारूची दुकाने बंद होती. यानंतर एकूण २३० कोटींची विक्री केली. यावर दिल्ली सरकारची स्वतंत्रपणे ७० टक्के स्पेशल कोरोना टॅक्सच्या माध्यमातून सुमारे १६१ कोटींची कमाई झाली.

प्रत्यक्षात, दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम आणि फरीदाबादसारख्या इतर भागातही दारूचे दर कमी होते. दिल्लीत दारु प्रचंड महागल्याने दारु विक्री सातत्याने कमी होत होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन दिल्ली सरकारने स्पेशल कोरोना टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. १० जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे. लोक आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक पेचात सापडले असताना अशा परिस्थितीत कोरोना टॅक्स काढून सरकारने लाखो तळीरामांना मोठा दिलासा दिला आहे.

Leave a Comment