भारतातील शास्त्रज्ञांचा दावा; कोरोना प्रतिबंधक औषध सापडले - Majha Paper

भारतातील शास्त्रज्ञांचा दावा; कोरोना प्रतिबंधक औषध सापडले


नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोनापासून मुक्तता मिळविण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधक अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पण अद्यापपर्यंत कोणत्याही देशाला कोरोना प्रतिबंधक लस बनवण्यात म्हणावे तसे यश मिळालेले नाही. त्यातच अनेक देशांमध्ये या प्रतिबंधक लसींची ट्रायल सुरु आहे. अशातच आता भारतातील शास्त्रज्ञांनी कोरोनाला रोखणारे असे प्रभावी औषध सापडल्याचा दावा केला आहे. असा काही घटक वनऔषधींमध्ये सापडला आहे, जो कोरोनावरील उपचारात मदत करु शकतो, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

काही वनऔषधींचा इंडियन काऊन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च (ICAR) आणि त्या अंतर्गत येणाऱ्या हरयाणातील नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्वॉइन्सच्या (NRCE) शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या विषाणूंवर प्रयोग करून पाहिला. कोरोनाशी लढण्याची VTC-antiC1 या नैसर्गिक घटकात क्षमता असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले.

1930 साली थैमान घालणाऱ्या इन्फेक्शिअस ब्राँकायटिस व्हायरस (infectious bronchitis virus – IBV) ज्याला चिकन कोरोना व्हायरस असेही म्हटले जाते त्यावर शास्त्रज्ञांनी VTC-antiC1 या नैसर्गिक घटकाचा प्रयोग करून पाहिला. VTC-antiC1 या नैसर्गिक घटकाचा कोरोनाच्या विषाणूविरोधात प्राथमिक अभ्यासात चांगला परिणाम दिसून आला आहे. याच अभ्यासाच्या आधारावर VTC-antiC1 मध्ये कोरोनाच्या विषाणूंवर उपचार करण्याची क्षमता असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

दरम्यान नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्वॉइन्सचे डायरेक्टर जनरल (अॅनमिल सायन्स) बीएन त्रिपाठी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, आम्हाला संशोधनात औषधी झाड कोरोना विषाणूविरोधात चांगला परिणाम देत असल्याचे आढळून आले. सध्या अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी या वनऔषधींचा वापर केला जातो आहे. हेच औषधी झाड जर कोरोनाचा अंत करेल तर फक्त देशच नाही तर संपूर्ण जगासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

Leave a Comment