मुंबई – ठाणे जिल्ह्यात रुग्णांना विनाकारण भीती दाखवून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर त्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बील आकारल्याप्रकरणी ठाणे महानगर पालिकेने ठाण्यातील दोन खासगी हॉस्पिटलला मोठा दणका दिला आहे.
विनाकारण भीती दाखवून अॅडमिट करणाऱ्या दोन हॉस्पिटलवर कारवाई
ठाण्यातील दोन हॉस्पिटल्सनी 13 ठाणेकरांना कोणताही आजार नसताना दाखल करुन घेतले होते आणि त्यांच्यावर 7 दिवस उपचार करुन त्यांच्याकडून लाखोंची बीले आकारल्याची माहिती आहे. याबाबत ठाणे महानगर पालिकेकडे तक्रार आल्यानंतर चौकशी करुन या दोन हॉस्पिटलवर ठाणे महानगर पालिकेने कारवाई केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांककडून हॉस्पिटल विरोधात तक्रारी येत होत्या. त्याची शाहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. हॉस्पिटलकडूनच नागरिकांची अशा प्रकारे पिळवणूक झाल्यानंतर एखाद्या हॉस्पिटलवर कारवाई होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असून यामुळे आता विनाकारण उपचार करणाऱ्यांना जरब बसण्यास मदत होणार आहे.