ट्रम्प यांचा दावा; कोरोना प्रतिबंधक लसीचे 20 लाख डोस तयार


वॉशिंग्टन : भारतातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मागील २४ तासात ९,८८७ नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे भारतातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,३६,६५७च्या टप्प्यावर पोहचला आहे. भारतात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने कोरोनाचे जवळपास १० हजार नवे रुग्ण सापडत असल्यामुळे सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत इटलीला मागे टाकत सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. या यादीत सगळ्यात वरच्या क्रमांकावर अमेरिका आहे. पण आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने कोरोनावर लस विकसित केल्याचा दावा केला आहे.

गुरुवारी कोरोनाच्या प्रतिबंधक लसीसंदर्भात आमची महत्त्वपूर्ण बैठक झाली. कोरोनावर मात करणारी एक लस वैज्ञानिकांनी विकसित केली आहे. 20 लाख डोस या लसीचे तयार आहेत. सुरक्षा संदर्भातील चाचणीत ही लस यशस्वी ठरली तर या लसीचे वितरण तात्काळ सुरु केले जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

आम्ही कोरोना प्रतिबंधक लसीबाबत अविश्वसनीय असे काम करत आहोत. आम्हाला या कामात सकारात्मक यश मिळण्याची शक्यता आहे. कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जात आहे. लस विकसित करण्याच्या कामात प्रगतीदेखील होत आहे. ही लस सुरक्षा तपासणीत यशस्वी ठरली तर आमच्याकडे या लसीचे 20 लाख डोस उपलब्ध आहेत. याशिवाय विविध भागात लस पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्थादेखील सज्ज असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा जगभरातील 186 देशांमध्ये प्रादुर्भाव झाला असून कोरोनामुळे या देशांतील अनेकांनी आपला जीव गमावला आहे. जगभरातील देशांसोबत कोरोनाची लस विकसित करण्याच्या दृष्टीने आमचे काम सुरु आहे. चीनसोबतही आम्ही काम करत आहोत. पण, जे घडले ते खूप वाईट होते, तसे व्हायला नको होते, असे देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Leave a Comment