सोनू सुदने चार्टर्ड विमानने केली १७० कामगारांची घरवापसी


बॉलिवूड अभिनेता सोनू सुद लॉकडाऊन काळात इतर राज्यांमधील अडकलेल्या कामगारांना आपल्या घरी जाण्यासाठी मदत केली आहे. आतापर्यंत स्वतःच्या खर्चाने सोनूने कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार येखील कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था करुन दिली आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या याच दिलदार वृत्तीमुळे सोशल मीडियावर त्याचे कौतुकही केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्व व्यवस्था ठप्प झाली असून आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकार हळुहळु सर्व गोष्टी सुरु करण्याच्या तयारीत आहे. या दरम्यानही कामगारांना आपल्या घरी पाठवण्याचे काम सोनूने सुरुच ठेवले आहे. त्यातच आता त्याने उत्तराखंडातील देहरादूनमधील १७० कामगारांसाठी खास चार्टर्ड विमानाची सोय केली आहे.

मुंबई विमानतळावरुन शुक्रवारी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान एअर अशिया कंपनीचे हे चार्टर्ड विमान १७३ कामगारांना घेऊन उडाल्यानंतर हे सर्व कामगार ४ वाजून ४१ मिनीटांनी देहरादून विमानतळावर पोहचल्याची माहिती एअर अशियाच्या प्रवक्त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली.

सोनू सुदने या सर्व कामगारांच्या तिकीटाचा खर्च केला होता. या कामगारांना घेऊन चार्टर्ड विमान गेल्यानंतर, मी अजुनही अडकलेल्या कामगारांना मदत करु शकतो, असा मला आत्मविश्वास मिळाला आहे. त्यांच्यापैकी अनेक कामगारांनी कधीही विमानप्रवासाची कल्पना केली नव्हती. पण ज्यावेळी त्यांना मी तुम्ही विमानाने घरी जाणार आहात असे सांगितले, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि आनंद पाहण्यासारखा असल्याचे म्हणत सोनूने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर यापुढे देखील गरजेनुसार अशाच प्रकारे विमानांची सोय करण्याची तयारीही यावेळी सोनूने दाखवली आहे.

Leave a Comment