धक्कादायक! एकाच आयएमईआय नंबरवर सुरू होते 13 हजार मोबाईल, चीनी कंपनीविरोधात तक्रार दाखल

सर्वसाधारणपणे एका मोबाईल फोनसाठी एक आयएमईआय नंबर असतो. हा आयएमईआय नबंर दुसऱ्या फोनला लागू होत नाही. मात्र चीनी स्मार्टफोन कंपनी व्हिवोच्या एका आयएमईआय नंबरवर तब्बल 13 हजार मोबाईल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याचा खुलासा मेरठ झोनच्या सायबर क्राइम पोलिसांनी केला आहे. सोबतच चीनी कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Image Credited – cheatsheet

मेरठच्या एडीजी झोनमधील सब-इंस्पेक्टर आशाराम यांच्याकडे व्हिवो कंपनीचा मोबाईल होता. फोनची स्क्रिन तुटल्याने त्यांनी 24 सप्टेंब 2019 ला फोन मेरठच्या व्हिवो सर्व्हिस सेंटरमध्ये फोन दिला होता. यानंतर कंपनीने बॅटरी, स्क्रीन आणि एफएम बदलून फोन त्यांना परत दिला. मात्र फोनची स्क्रीन पुन्हा खराब झाल्याने त्यांनी तपासणी केल्यावर आयएमईआय नंबरसोबत छेडछाड झाल्याचे आढळले. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश दिले.

Image Credited – Android Authority

तपासात आढळले की त्यांच्या मोबाईलचा आयएमईआय नंबर बदलण्यात आलेला आहे. सर्व्हिस सेंटरच्या मॅनेजरला विचारल्यावर त्यांनी मोबाईलच्या आयएमईआय नंबर बदलला नसल्याचे सांगितले. टेलिकॉम कंपनी जिओकडून डेटा मागितल्यानंतर समोर आले की, 24 सप्टेंबरला एकाच आयएमईआय नंबरवर 13,557 मोबाईल नंबर सुरू होते.

उत्तर प्रदेश पोलिसांनी या संदर्भात व्हिवो इंडियाला नोटीस बजावली आहे. सायबर सेलचे म्हणणे आहे की व्हिवो इंडियाचा हा बेजबाबदारपणा आहे व त्यांनी ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, कंपनीच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment