रायगडाच्या संवर्धनाबाबत माझ्यापेक्षा संभाजीराजेंना विचारलेले बरे


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना किल्ले रायगडाच्या संवर्धनाच्या बाबतचा प्रश्न विचारला असता त्यांनी रायगडाच्या संवर्धनाचे काम का रखडले आहे हा प्रश्न तुम्ही माझ्यापेक्षा खासदार युवराज संभाजीराजे यांनाच विचारलेला बरा. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे रायगडाच्या संवर्धनाचे काही प्रमाणात काम झाले आहे, पण सतराव्या शतकात जसा रायगड होता तसा बघायला सगळ्यांनाच आवडेल आणि जगातील ते आठवे आश्चर्य असेल, असे म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे आज मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन साजरा करावा लागत आहे. आज लोकांचे राज्य आले आहे, खऱ्या अर्थाने हा लोकांचा उत्सव असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा झाली असून नुकसान भरपाईबद्दल राज्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होईल, असे कोल्हे यांनी सांगितले.

त्याचबरोबर मागील 21 वर्षांपासून पुणे आणि नाशिक दरम्यानचा रेल्वे प्रकल्प रखडला होता. त्याला आता गती मिळत आहे, पण त्याबद्दल आत्ताच कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. या रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र सरकार 20 टक्के आणि राज्य सरकार 20 टक्के वाटा उचलणार आहे. उरलेली 60 टक्के रक्कम कर्जाच्या स्वरुपात उभारली जाणार असल्याचे कोल्हे यांनी नमूद केले. आत्ता रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकल्पासाठी प्रिन्सिपल अप्रूव्हल मिळाले आहे. त्यानंतर याला राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये प्रिन्सिपल अप्रूव्हल मिळेल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment