सोनू सुदच्या नावे स्थलांतरित मजुरांची फसवणूक; केले सतर्क राहण्याचे आवाहन


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला असून पण या लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यात विशेषतः महाराष्ट्रात स्थलांतरित मजूर अकडून पडले होते. त्यांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सुदने मदतीचा हात पुढे करत, या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी व्यवस्थित पोहचवण्याचा विडा उचलला. त्यानुसार त्याने अनेकांची उत्तर प्रदेश, बिहार मध्ये घरपोच मोफत पोहचवण्याची व्यवस्था देखील केली.


पण या संकटामध्ये आता काहींनी परिस्थितीचा गैरफायदा घेत सोनु सुदच्या नावाने पैसे उकळत असल्याचे काही प्रकारदेखील समोर आले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून अभिनेता सोनू सुदने काही स्क्रीन शॉर्ट्स शेअर करत मजुरांना अशा प्रकारापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्थलांतरित मजुरांना घरी पाठवण्यासाठी आपण कोणतेही शुल्क घेत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. असा कोणताही प्रकार समोर आल्यास तात्काळ माझ्याशी किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा असे देखील सांगितले आहे.

कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रातील अनेक मजुरांचा कामधंदा गेला आहे. यामुळे हातावर पोट असणार्‍यांनी घरी परत जाण्याचा मार्ग निवडला. पण सुरूवातीला श्रमिक स्पेशल ट्रेनच्या यादीत नंबर न लागलेले किंवा इच्छित स्थळी जाण्यासाठी ट्रेन नसल्याने अनेकांची होणारी गैरसोय पाहून सोनू सुद मदतीसाठी पुढे आला होता. त्याने शेकडो लोकांची मूळगावी परतण्याची व्यवस्था देखील केली. अनेक स्तरातून त्याच्या या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. पण काहीजण मजुरांच्या या परिस्थितीचा फायदा घेत त्यांची फसवणूक करत असल्याचा प्रकारदेखील आता समोर आला आहे.

Leave a Comment