ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकारी कोरोनाबाधित, कार्यालय ‘सील’


नवी दिल्ली – दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, काल शुक्रवारी या पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आले असून हे कार्यालय उद्यापर्यंत सील असणार आहे. तर, कोरोनाची लागण झालेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या काही कुटुंबियांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बरेच निर्बंध शिथिल केल्यानंतर देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी नऊ हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. शुक्रवारी कोरोनामुळे २९५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी एवढे मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या देशांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इटलीमध्ये दोन लाख ३४ हजार ५३१ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती. भारतात हीच संख्या दोन लाख ३६ हजार ११७ आहे.

Leave a Comment