देशात सध्या कोरोना व्हायरसचे संकट आहे. या संकटाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी विविध गोष्टींना स्पर्श करणे गरजेचे आहे. असेच एक ठिकाण म्हणजे एटीएम. दररोज शेकडो लोक एटीएमचा वापर करतात. ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. यावर पर्याय म्हणून आता बँका आता कॉन्टॅक्टलेस एटीएम आणणार आहेत.
कोरोना : संसर्ग टाळण्यासाठी आता बँक आणणार कॉन्टॅक्टलेस एटीएम

पेमेंट्स कंपनी एजीएस ट्रँसॅक्ट टेक्नोलॉजीने यासाठी एक प्रोटोटाईप तयार केला आहे. यात स्क्रीनवर क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी मशीनच्या इंटरफेससाठी बँकेच्या मोबाईल अॅपचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे एटीएममध्ये ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी मॅग्नेटिक स्ट्रिप अथवा पिनचा वापर केला जातो. मात्र कॉन्टॅक्टलेस एटीएम वापरण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या मोबाईल अॅपचा वापर करावा लागेल. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ग्राहक मोबाईलवरच रक्कम आणि पिन टाकू शकतील व मशीनमधून पैसे बाहेर येतील.
जवळपास 70 हजार एटीएमचे कार्य पाहणारे एजीएस ट्रँस्कॅट लवकरच दोन बँकांसाठी ही कॉन्टॅक्टलेस एटीएम सुविधा पुरवणार आहे. सोबतच अन्य चार बँकांसोबत चर्चा सुरू आहे. यासाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल करावा लागेल व याला 8 आठवडे लागू शकतात.
एजीएस ट्रँसॅक्टचे सीटीओ महेश पटेल म्हणाले की, कार्डच्या तुलनेत क्यूआर कोडद्वारे पैसे काढणे अधिक सुरक्षित आहे. ही प्रक्रिया वेगवान देखील आहे व यासाठी जास्तीत जास्त 25 सेंकद लागतात. प्रत्येक बँकेच्या अॅपमध्ये हे अॅप्लिकेशन जोडता येईल.