चीनला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार गरजेचा – बाबा रामदेव

मागील एक महिन्यापासून भारत आणि चीनमध्ये सीमावादावरून तणाव निर्माण झाला. नागरिक चीनीवस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. याच पार्श्वभुमीवर योग गुरू रामदेव बाबा यांनी देखील चीनला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. ते आज तकच्या कार्यक्रमात बोलत होते.

रामदेव म्हणाले की, देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आपले सैन्य पुर्णपणे सक्षम आहे. चीनला शस्त्राने मात देण्याऐवजी त्यांच्या सामानावर बहिष्कार टाकला पाहिजे. कारण 15 ते 20 लाख कोटींचा व्यापार चीन आपल्या देशातून करतो. देशात आज टॉयलेटच्या सीटपासून ते खेळण्यापर्यंत अनेक गोष्टींचे चीनमध्ये उत्पादन होते. चीनी वस्तूंवर बहिष्कारासाठी मोठे संकल्प घ्यायला हवे. चीनला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर बहिष्काराचा संकल्प केला पाहिजे. चीनला धडा शिकवण्याचा हाच योग्य मार्ग आहे.

रामदेव म्हणाले की, चीन नेहरूंच्या काळापासून भाई-भाईचा नारा देत आपल्याला लूटत आहे. अशात चीनच्या उत्पादनांवर केवळ बहिष्कारच नाही तर त्याच्या प्रति द्वेषाचे वातावरण निर्माण करायला हवे. याशिवाय स्वदेशी वस्तूंसाठी देखील धोरणे बनवायला हवीत. चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून भारताला उभे करण्यासाठी देशात इलेक्ट्रॉनिक, खेळण्यांच्या उत्पादनांसाठी मॅन्युफॅक्चरिंग हब हवे आणि करात सूट हवी. हा 5 लाख कोटींचा व्यवसाय आहे.

ते म्हणाले की, चीनसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन बनवण्यात यावे. कंपन्यांना सरकारने सूट द्यावी. चीनमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांवर कर वाढवावा. असे वातावरण निर्माण करावे की लोक देशात जास्तीत जास्त उत्पादन करतील व त्याचा वापर करतील.

Leave a Comment