टकलुंना करोना संक्रमणाचा जास्त धोका, नवे संशोधन

फोटो साभार एशियन एज

जगभर दहशत माजाविलेल्या करोना कोविड विषाणूंची लागण होण्याचा धोका महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक असल्याचे मागेच सिद्ध झाले आहे. मात्र नव्याने झालेल्या संशोधनात हा धोका पुरुषांमध्येही जे टकलू आहेत त्यांना जास्त असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेच्या ब्राऊन विद्यापीठातील संशोधक कार्लोस बॉम्बीअर यांच्या म्हणण्यानुसार या संदर्भात दोन वेगळी संशोधने केली गेली मात्र दोन्हीचे निष्कर्ष एकच आले आहेत.

पहिल्या संशोधनाचा अहवाल सांगतो, करोनाची लागण होण्याचा धोका महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त आहे. इतकेच नव्हे तर मृतात महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक आहे. यासाठी ४१ करोना रुग्णांवर संशोधन केले गेले तेव्हा त्यात ७१ टक्के पुरुष टकलू होते असे दिसून आले. हे संशोधन स्पेन मधील रुग्णालयात केले गेले.

अमेरिकन अॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी मध्ये १२२ पुरुषांवर दुसरे संशोधन केले गेले त्यात लागण झालेल्या पुरुषात टकलू पुरुष ७९ टक्के होते असे दिसून आले. यामागे असे कारण दिले जात आहे, पुरुषांमधील सेक्स हार्मोन अँड्रोजेन दिल्या गेलेल्या औषधाचा परिणाम कमी करते म्हणजेच करोना संक्रमणाची शक्यता वाढते. परिणामी रुग्ण बरा होण्यास अधिक वेळ लागतो.

हे हार्मोन पेशींतील संक्रमणाचे प्रवेशद्वार ठरू शकते. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये लागण अधिक दिसण्याची अन्य कारणेही आहेत. त्यात धुम्रपान, महिलांची इम्युनिटी जास्त ताकदीची असणे, मधुमेही आणि रक्तदाबाचे पुरुष रुग्ण अधिक प्रमाणात असणे आणि महिलांच्या तुलनेत पुरुषांचे हात धुण्याचे प्रमाण कमी असणे यांचा समावेश आहे.

Leave a Comment