सहा आठवड्यांमध्ये सहावा करार; जिओमध्ये 1.85 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार अबू धाबीची कंपनी


नवी दिल्ली – रिलायन्स ग्रुपमध्ये लॉकडाउनदरम्यान अजून एक मोठी कंपनी गुंतवणूक करणार असून जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अबू धाबीची मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी गुंतवणूक करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्‍ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी दिली आहे. मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी अबू धाबीमधील मोठी गुंतवणूक करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. रिलायन्स इंडस्‍ट्रीज लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी 9,093.60 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. कंपनी या गुंतवणुकीद्वारे जिओमध्ये 1.85 टक्के हिस्सेदारी खरेदी करेल.

यासोबतच रिलायन्स जिओचा गेल्या सहा आठवड्यांमधील हा सहावा मोठा करार ठरेल. गेल्या सहा आठवड्यांमध्ये या गुंतवणुकीसह कंपनीत जगातील विविध आघाडीच्या कंपन्यांकडून एकूण 87,655 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याची माहितीही रिलायन्स इंडस्‍ट्रीज लिमिटेडने दिली. जिओ प्‍लॅटफॉर्म्‍समध्ये यापूर्वी मुबादलाव्यतिरिक्त फेसबुक, सिल्‍वर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक आणि केकेआर या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.

Leave a Comment