कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली आहे. मात्र त्यांनी हा निर्णय कोरोना व्हायरसमुळे नाही तर पॉवर प्लांट स्टोरेज सेंटरमधील गळतीमुळे तब्बल 20 हजार टन डिझेल वाहून गेल्याने घेतला आहे. ही घटना नॉरिल्स्क शहरच्या बाहेरील भागात स्थित पॉवर प्लांटमध्ये घडली आहे. येथे गळती झालेले हजारो टन डिझेल अंबरनाया नदीत वाहून गेले आहे. अंबरनाया नदीचे पाणी एका सरोवराशी मिळते. ज्याचे पाणी दुसऱ्या नद्यांद्वारे आर्कटिक सागरात जाऊन पोहचते.
हजारो टन डिझेल नदीत वाहिले, पुतीन भडकले, रशियाने केली आणीबाणी घोषित

सध्या इंधनाचा नदीतील प्रवाह रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबतची माहिती दोन दिवस उशीरा मिळाल्याने पुतीन अधिकाऱ्यांवर भडकले आहेत. पुतीन यांनी ही परिस्थिती हाताळण्यावर नाराजी व्यक्त केली आहे, सोबतच सायबेरियामध्ये आणीबाणी लागू केली आहे.

ज्या पॉवर प्लांटमधून इंधनाची गळती झाली ते नॉरलिस्क निकेलचे एक यूनिट आहे. ही निकेल आणि पॅलेडियम धातूचे उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी नॉरलिस्क निकेलने म्हटले की, डिझेल गळती झाल्याची माहिती योग्य वेळी व योग्यरित्या देण्यात आली होती. फ्यूल टँक आणि पॉवर प्लांटला असलेला एक खांब धसल्यामुळे इंधन गळती सुरू झाली. हा प्लांट बर्फाने गोठलेल्या जमिनीवर उभारलेला आहे. तापमानात वाढ झाल्यास जागा वितळू लागल्याने प्लांटमध्ये लागलेल्या खांब धसला.

या घटनेवर वर्ल्ड लाईफ फंड रशियाचे संचालक एलेक्सी म्हणाले की, डिझेल गळती पर्यावरणासह प्राण्यांसाठी देखील धोकादायक आहे. या घटनेमुळे 1 कोटी 30 लाख डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.