अखेर युवराज सिंहचा ‘त्या’ विधानाबद्दल माफीनामा


रोहित शर्मासोबतच्या लाईव्ह चॅटदरम्यान टीम इंडियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंह याने अखेर एक जातीबद्दल वादग्रस्त शब्द प्रयोग केल्या प्रकरणी माफी मागितली आहे. त्या वक्तव्यबद्दल युवराजने माफी मागताना ट्विटरवर लिहिले की, आपला कोणत्याही प्रकारच्या भेदभावावर विश्वास नाही आणि आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. जर आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी युवराजचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात रोहित शर्मासोबतच्या लाइव्ह चॅट दरम्यान त्याने जातीवाचक शब्द वापरताना दिसला होता. रोहितसोबत चॅटमध्ये युवीने युजवेंद्र चहलला ‘भंगी’ असे संबोधले होते आणि त्या विधानानंतर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. इतकेच नाही तर, दलित हक्कांसाठी लढणाऱ्या एका कार्यकर्त्याने युवराजविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर आता युवीने आपली बाजू मांडली.


ट्विटरवर युवराजने एक निवेदन जारी करत लिहिले की, मला हे स्पष्ट करून सांगायचे आहे की रंग, जात, पंथ किंवा लिंगाच्या आधारे कोणत्याही भेदभावावर माझा विश्वास नाही. मी माझे जीवन लोकांच्या हितासाठी जगले आहे आणि भविष्यातही तेच करायचे आहे. मी प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो. मी माझ्या मित्रांशी बोलत होतो आणि त्यावेळी माझा मुद्दा चुकीच्या अर्थाने घेतला गेला, जे अयोग्य होते. एक जबाबदार भारतीय म्हणून मला सांगायचे आहे की माझ्या बोलण्याने मी नकळत एखाद्याला दुखवले तर मी खेद व्यक्त करतो. माझे देशाबद्दल आणि देशातील लोकांबद्दल माझे प्रेम कायम आहे.

Leave a Comment