पुण्यात या चार गावातील लोकांच्या प्रवेशावर बंदी


पुणे : राज्यात जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच आहे. त्यातच आता पुण्यातील नागरिकांसाठी वेगळे नियम असणार आहेत. पुण्यातील अनेक बाजारपेठा आणि दुकाने आज उघडी केली असतानाच दूसरीकडे काही गावे मात्र पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात जाऊ नये, यासाठी हवेली तालुक्यातील शहरालगतच्या चार गावांमधील सरकारी, खासगी संस्थामधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांना पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात प्रवेश बंदी घालण्यात येणार आहे.

ही बंदी येत्या शनिवारपासून (ता. 6 ) ते शुक्रवारपर्यंत (ता . 12) असल्याचे आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी जारी केले आहेत. शासकीय यंत्रणेची हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती, नऱ्हे आणि वाघोली येथील रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी बैठक झाली. सर्वानुमते आढळलेल्या गावांमधील नागरिकांच्या हालचालीवर पुणे व पिंपरी चिंचवडच्या हद्दीतील शासकीय कार्यालये, खासगी कंपनी अथवा करणाऱ्यावर काही बंधने घालणे आवश्यक असल्याचे म्हणणे या बैठकीमध्ये मांडले.

येथील सर्व अधिकारी कर्मचारी अथवा कामगार यांना सात दिवस त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यास शक्य नसल्यास स्वत : सात दिवस घरी रहावे अथवा कामाच्या ठिकाणीच राहून काम करावे किंवा स्वत : च्या घरी विलगीकरण करून काम करावे, असे आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.

मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती, नऱ्हे, वाघोली या गावात प्रवेशबंदी असणार आहे. त्यामुळे आता या गावांमध्ये पुढचे सात दिवस पुणेकर जाऊ शकणार नाहीत. एकीकडे ही बंदी तर दुसरीकडे अडीच महिने बंद असलेली महात्मा फुले मंडई आजपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर महिलांचे खरेदीचे आवडते ठिकाण तुळशीबाग मार्केट आणि तरुणाईमध्ये लोकप्रिय शॉपिंग स्पॉट हॉंगकॉंग लेन हेही सुरू होत असल्यामुळे आनंदाचे वातावरण पुणेकरांमध्ये आहे. पण या दरम्यान, नियमांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे.

या बाजारपेठा मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टंसिंगबाबतचे सम विषम नियम पाळून सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच सकाळी 6 ते 8 तसेच संध्याकाळी 5 ते 7 वाजता शहरातील प्रमुख बागाही फिरण्यासाठी आणि व्यायामाकरिता सुरू झाल्या. पण, तिथे लहान मुले, जेष्ठ नागरिक यांना परवानगी दिलेली नाही. यातही लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.

Leave a Comment