या शेतकऱ्याने उगवले जगातील सर्वात उंच कोथिंबीरचे झाड, गिनीज बुकमध्ये नोंद

उत्तराखंडच्या अल्मोडा येथील ताडीखेत विकासखंडचे शेतकरी गोपाल दत्त उप्रेती यांनी जगातील सर्वात उंच कोथिंबीरचे झाड उगवून जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी 2.16 मीटरचे (7 फूट 1 इंच) कोथिंबीर झाड उगवले असून, याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या आधी 6 फूट उंच कोथिंबीरच्या झाडाचा विक्रम जर्मनीच्या नावावर होता.

Image Credited – Amarujala

गोपाल यांचे जीएस ऑर्गेनिक सफरचंदाचे फार्म आहे. ते 0.2 हेक्टरमध्ये कोथिंबीर आणि लसणाची शेती करतात. तर 1.5 हेक्टरमध्ये सफरचंद आणि इतर भाज्यांची लागवड करतात. एप्रिल महिन्यात मुख्य उद्यान अधिकारी त्रिलोकी नाथ पांडे आणि विवेकानंद पर्वतीय कृषि संशोधनाचे वैज्ञानिक डॉ. चौधरी यांनी त्यांचे फार्मचे निरीक्षण केले होते. यात त्यांना कोथिंबीरचे झाड सरासरीपेक्षा मोठे असल्याचे आढळले होते. इतर अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांना 7 फूट 1 इंच उंचीचे कोथिंबीरचे झाड आढळले. येथील इतर झाडे देखील 5 ते 7 फूट उंचीची होती.

सिव्हिल इंजिनिअर असलेले गोपाल उप्रेती यांनी या कामगिरीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज केला. ते म्हणाले की गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद होणे देशाच्या सर्व शेतकऱ्यांसाठी सन्मानाची बाब आहे. खासकरून सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात ही एक मोठी कामगिरी आहे.

Leave a Comment