उद्धव ठाकरेंना लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान


मुंबई : एका खासगी सर्वेक्षणाच्या अहवालानुसार उद्धव ठाकरे यांचा समावेश सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत करण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल, हेच माझे ध्येय आहे. त्याचबरोबर जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे. मुख्यमंत्रिपद हे निमित्त आहे, महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्त्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल, हेच माझे ध्येय असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकाऱ्यांचे आभार या सर्वांचे आभार. अर्थात तमाम शिवसैनिकांचे प्रेम आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांचा आशीर्वाद याशिवाय ही झेप शक्य नाही, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.


‘आयएएनएस’ आणि ‘सीव्होटर्स’ संस्थेने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच समोर आला आहे. 76.52 टक्के एवढी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तर ओदिशाचे गेली सलग वीस वर्षे मुख्यमंत्रिपद भूषवणारे नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. देशातील विविध राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या स्थानी 82.96 टक्क्यांसह नवीन पटनायक (ओदिशा), त्यानंतर दुसऱ्यास्थानी भूपेश बघेल (छत्तीसगड) 81.06 टक्के, तिसऱ्या स्थानी पिनराई विजयन (केरळ) 80.28 टक्के, चौथ्या स्थानी जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश) 78.52 टक्के आणि 76.52 टक्क्यांसह पाचव्या स्थानी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत.

Leave a Comment