बांधकाम व्यावसायिकांना पियूष गोयल यांचा सल्ला; किंमती कमी करा आणि घरे विका


नवी दिल्ली – केंद्र सरकार कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रेडी रेकनरचे दर कमी करण्याबाबत विचार करेल, पण आपल्याकडे सध्या असलेल्या घरांच्या किंमती कमी करून बांधकाम व्यावसायिकांनी त्या विकायला हव्यात असा सल्ला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी दिला आहे. बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रमुख बांधकाम व्यावसायिकांशी गोयल यांनी संवाद साधला. गोयल म्हणाले, की बांधकाम बाजारातील परिस्थिती सुधारेल या भरवशावर न राहाता व्यावसायिकांनी त्यांच्याकडे असलेली घरे किंमती कमी करुन विकावीत.

बांधकाम व्यावसायिकांशी साधलेल्या संवादात गोयल यांनी म्हटले की, रेडी रेकनर दरात सवलत देण्याबाबत आम्ही विचार करत आहोत, पण तसे झाले किंवा नाही तरीही तुम्हाला तुमच्याकडे साठ्यात असलेली घरे विकावी लागणार आहेत. तुम्ही दर कमी करून जोपर्यंत घरे विकत नाही, तोपर्यंत तुम्ही साठ्याच्या बंधनात असाल. साठा तसाच ठेवाल, कर्जाचा बोजा वाढत जाईल आणि मग तुमच्या हातातील साठाही निघून जाईल. सरकारकडून मदत मिळेल, घर खरेदीची परिस्थिती सुधारेल, या आशेवर राहू नका असेही गोयल यांनी सांगितले.

निरंजन हिरानंदानी या संवादानंतर मुंबई मिरर या वर्तमानपत्राशी बोलताना म्हणाले की, घरांच्या किंमती रेडी रेकनर दरात कपात झाल्याशिवाय आम्ही कमी करू शकत नाही. हिरानंदानी म्हणाले, की बाजार भावापेक्षा जर रेडी रेकनरचे दर जास्त असतील तर त्याचा फटका सरकारलाच बसणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करताना सरकारला रेडी रेकनर दराच्या चार पट जास्त दर द्यावा लागतो. त्यामुळे हे दर जर जास्त असतील तर त्याचा तोटा हा सरकारलाच सहन करावा लागेल.

गोयल बांधकाम व्यावसायिकांसोबतच्या संवादादरम्यान म्हणाले की कोणाला जर वाटत असेल की या परिस्थितीत सरकार अर्थपुरवठा करेल आणि आपण घरे न विकता दीर्घकाळापर्यंत, परिस्थिती सुधारेपर्यंत तग धरु तर त्यांना मी एवढेच सांगेन की परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीमध्ये उत्तम उपाय हा साठ्यातील घरे किंमती विकणे हाच असल्याचे गोयल यांनी सांगितले. ज्यांनी घरे विकली आहे, त्यांचा तोटा कमी झाला किंवा कर्जमुक्त होण्यास मदत झाल्याचेही गोयल म्हणाले.

Leave a Comment