पालघरमधील पंक्चर काढणारा तरुण झाला IAS


आजवर माझापेपरने आपल्या पर्यंत अनेक यशोगाथा पोहचवल्या आहेत. त्यानुसार आज आम्ही आणखी एका तरुणाची यशोगाथा सांगणार आहोत. त्या तरुणाच्या डोक्यावरुन लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. त्यातच घरची परिस्थिती तशी बेताची होती, पण शिक्षणासाठी खिशात दमडीही नाही. पण त्या तरुणाने कष्ट, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य गोष्ट साध्य करुन दाखवली. त्या तरुणाचे वरूण बरनवाल असे आहे आणि तो आता IAS झाला आहे.

वरुण बरनवाल पालघरजवळील बोईसरमध्ये लहानाचा मोठा झाला. दहावीची परीक्षा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वडिलांचे आकस्मिक निधन झाले. घरातील परिस्थिती हलाकीची असल्यामुळे पुढील शिक्षण सुरु ठेवायचे की नाही यावर घरात चर्चा व्हायची. त्यातच एक भाऊ आणि बहिणीचे शिक्षण देखील समोर असल्यामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावले. पण वरूणच्या मदतीला या संकटकाळी आई, मित्र आणि जवळचे नातेवाईक धावून आले.

वरूणने घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे सायकल दुकानात कामाला सुरूवात केली. वरुणने सायकल पंक्चर काढण्याचे काम करत करत आपल्या पुढील शिक्षणाला सुरुवात केली. पैशामुळे वरूणची शिकण्याची जिद्द आणि आवड थांबली नाही. वरुण खिशात पैसे नसताना मेहनतीच्या जोरावर आयएएस अधिकारी झाला.

दहावीची २००६ मध्ये परीक्षा दिल्यानंतर दोन दिवसांत वडिलांचे छत्र हरपले. त्यात घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे शिक्षण सोडून देण्याचा विचार केला. पण दहावीच्या निकाल लागला अन् वरूणचे मत परिवर्तन झाले. वरुण शाळेत पहिला आला होता. वरूणची दहावीचे गुण पाहून शिक्षक आणि कुटुंबियांनी त्याचे शिक्षण पुढे देखील सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

घराजवळील महाविद्यालयात ११ वीला शिक्षण घ्यायचे होते पण डोनेशन देण्यासाठी दहा हजार रूपयेही खिशात नव्हते. त्यावेळी शिक्षण सोडून द्यायचा विचार केला, पण ही गोष्ट त्यावेळी त्याच्या वडिलांचा इलाज करणाऱ्या डॉक्टरांना कळली. त्यांनी वरूणला मदत केली आणि महविद्यालयात अॅडमिशन घेऊन दिले. दहावीनंतरची दोन वर्ष वरूणसाठी हालाखीची होती. वरुण सकाळी सहा वाजता उठून कॉलेजला जायचा. दुपारी दोन वाजल्यानंतर शिकवण्या घ्यायचा. त्यातून त्याला काही पैसे मिळायचे. त्यानंतर तो दुकानावर जाऊन हिशोब करण्याचे काम करायचा.

त्यातच पुण्यातील एमआयटीमध्ये वरूणचा नंबर लागला. वरूण इंजिनिअरिंग करण्यासाठी पुण्याकडे रवाना झाला. त्याला त्यावेळीही शिक्षक आणि मित्राने आर्थिक मदत केली. वरूण या प्रवासाबाबत सांगतो, शिक्षक, डॉक्टर आणि माझ्या मित्रांचा माझ्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर वरूणला अनेक खासगी कंपन्यांमधून चांगल्या ऑफर येत होत्या. वरूणने त्यावेळी सरकारी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने त्यांनी युपीएससीची तयारी सुरू केली. युपीएससीचा सर्व खर्च त्याच्या भावाने उचलला. वरूणने २०१३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत ३२ वा क्रमांक मिळवला.

Leave a Comment