मृत्यूपुर्वी जॉर्ज फ्लॉयड यांना झाला होता कोरोना – शवविच्छेदनात आले समोर

मागील आठवड्यात अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयड यांचा पोलीस कस्टडीमध्ये असताना मृत्यू झाला होता. जॉर्ज यांचा शवविच्छेदन अहवाल जारी करण्यात आला असून, मृत्यूपुर्वी त्यांना काही आठवडे आधी कोरोनाची लागण झाली होती, असे समोर आले आहे.

हेनेपिन काउंटी वैद्यकीय परीक्षकांनी 20 पानांचा अहवाल जारी केला असून यात 3 एप्रिलला फ्लॉयड कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले आहे. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती.

दरम्यान, मिनिओपोलिसचे माजी पोलीस अधिकारी डेरेक चॉउविन यांच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेरेक यांचा जॉर्ज फ्लॉयड यांच्या मानेवर गुडघे टेकून बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्यासह इतर तीन पोलीस अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फ्लॉयड यांचा मृत्यू मनुष्यवध असल्याचे म्हटले आहे. मेंदूपर्यंत रक्त आणि हवेचा पुरवठा बंद झाल्याने त्यांना श्वास घेण्यास समस्या निर्माण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment