वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नका, पण एक गोष्ट मात्र नक्की करा


मुंबई : दरवर्षी 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा होतो, पण यंदा कोरोना संकटामुळे सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरांचे आयोजन राज्यभर करण्यात यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

येत्या 10 जून रोजी राष्ट्रवादी पक्षाचा 21 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. हा वर्धापन दिन कोरोना संकटामुळे सार्वजनिकरित्या व मोठ्या प्रमाणावर साजरा करता येणार नसला तरी आपली सामाजिक बांधिलकी वर्धापन दिनाच्या निमित्ताने पार पाडण्याची गरज आहे. रक्ताची कोरोना रुग्णांना गरज पडत नाही, परंतु राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या थॅलेसेमिया आणि अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी पुढे यावे, स्वत: रक्तदान करावे, इतरांनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करावे आणि रक्त संकलनाच्या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन अजित पवार आणि जयंत पाटील यांनी केले.


पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राज्यावरील कोरोनाचे संकट आणि गेल्या अडीच महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे केलेल्या जनसेवेबद्दल या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करुन आभार मानले. समाजातील दुर्बल, वंचित घटकांना तसेच अडचणीत असलेल्या बांधवांना पक्षीय आणि वैयक्तिक पातळीवर मदत करण्याची परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असेही आवाहन दोन्ही नेत्यांनी केले.

Leave a Comment