टीम इंडियाचा सिक्सर किंग अशी ओळख असणार माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग हा कधी त्याने केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे, तर कधी त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे कायमच चर्चेत असतो. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर युवराज अनेकदा लाइव्ह आला. पण यावेळी रोहित शर्मासोबत लाइव्ह येणे त्याला खूपच महागात पडले आहे. युवराज सिंगने रोहित शर्मासोबत लाइव्ह चॅटदरम्यान जातीवाचक आक्षेपार्ह उल्लेख केला होता. एका ठराविक समाजाचा त्या शब्दामुळे अपमान झाल्याचे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केल्यामुळे ट्विटरवर सोमवार रात्रीपासूनच #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. त्या हॅशटॅगमागे युवराज सिंगने माफी मागावी अशी नेटकऱ्यांची मागणी होती. त्यातच आता या प्रकरणी पोलीसात युवराज विरूद्ध तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे.
आक्षेपार्ह उल्लेख प्रकरणी युवराज सिंग विरोधात पोलिसात तक्रार दाखल
यासंदर्भातील वृत्त झी न्यूजने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, युवराज विरोधात हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील हंसी गावात दलित समाजातील मानवाधिकार कार्यकर्ते अॅडव्होकेट रजत कळसन यांनी तक्रार दाखल केली आहे. कळसन यांनी तक्रार दाखल केल्यावर रोहितवरही निशाणा साधला आहे. युवराजने केलेल्या बेजबाबदार वक्तव्यावर रोहितने विरोध दर्शवायला हवा होता, पण त्याने ती गोष्ट हसण्यावर नेत युवराजच्या वक्तव्याशी सहमत असल्याचे दर्शवले. अशा शब्दात कळसन यांनी रोहितवरही निशाणा साधला. त्याचबरोबर पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर युवराजच्या अटकेचीही त्यांनी मागणी केली. तसेच त्यांनी यावेळी प्रकरणाचे रेकॉर्डींग असलेली सीडी आणि कागदपत्रेही पोलिसांच्या ताब्यात दिली जातील, असेही सांगितले.