पोलंडच्या या महालात लपविले आहे हिटलरचे २८ टन सोने

फोटो साभार लाईव्ह सायन्स

दुसऱ्या महायुद्ध काळात हिटलरचे २८ टन सोने पोलंड मधील एका महालात लपविले गेल्याचे एका सैनिकाच्या डायरीवरून उघड झाले आहे. विशेष म्हणजे ही डायरी खरी असल्याचा निर्वाळा जर्मनी कडून दिला गेला असल्याचा दावा केला जात आहे. रशियन सेनेपासून या सोन्याचा बचाव व्हावा म्हणून पोलंडच्या व्रोकाल शहरातील होचबर्ग पॅलेसच्या मैदानात एका विहिरीच्या शाफ्ट खाली जमिनीत २०० फुट खोल सोन्याची नाणी, लगडी, दागिने पुरण्यात आले होते.

पोलिश जर्मन सिलेसियन ब्रीज फौंडेशनच्या संशोधकाने हा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही माहिती हिटलरच्या खासगी सैन्यातील एका शिपायाच्या डायरीत मिळाली होती. जर्मनीचा पराभव होणार अशी शक्यता दिसू लागल्यावर पोलंडचे तत्कालीन शहर ब्रेस्लाऊ म्हणजेच सध्याचे व्रोकाला येथील रिच बँकेत जमा करण्यासाठी हे सोने आणले गेले होते मात्र ते बँकेत जमा होऊ शकले नाही.

१९४५ मध्ये दुसरे महायुद्ध सुरु असताना जर्मनीतील अनेक श्रीमंत व्यक्तींनी त्यांचे किमती सामान, सोने नाणे रशियन सेनेपासून सुरक्षित राहावे म्हणून जर्मन सेनेच्या ताब्यात दिले होते. त्या संपत्तीचे मूल्य आजच्या दराने १.२ अब्ज युरो पेक्षा अधिक होते असे सांगितले जाते. या जागेचा शोध पोलिश जर्मन सिलेशीयन फौंडेशनचे प्रमुख रोमन फुर्मानी यांनी या खजिन्याचा शोध घेण्याचा सरकारवर दबाव पडावा यासाठी हे सार्वजनिक केल्याचे म्हटले आहे.

सरकारने या महालाच्या काही विशिष्ट भागात खोदाई करण्याची परवानगी दिली आहे पण अर्थसाहाय्याशिवाय ही खोदाई पूर्ण करणे अवघड असल्याचे सांगितले जात आहे. ज्या भागात खोदाईची परवानगी दिली गेली आहे तेथे सीसीटीव्ही बसविले गेले आहेत.