जागतिक सायकल दिनी अॅटलस कंपनी कफल्लक

फोटो साभार नॅॅशनल हेराल्ड

देशातील सर्वात मोठी सायकल उत्पादक कंपनी अॅटलस, जागतिक सायकल दिनी म्हणजे ३ जून रोजी कफल्लक झाली असल्याची बातमी आली आहे. कच्चा माल खरेदी करण्यासाठीही कंपनीकडे पैसे नसल्याने कंपनीत ले ऑफ पुकारला गेला असून ४५० कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एके काळी वर्षात ४० लाख सायकली तयार करण्याचा विक्रम या कंपनीने केलेला आहे.

देशातील ही सर्वात मोठी सायकल कंपनी गेले काही दिवस आर्थिक तंगीचा सामना करत होती. १९५१ मध्ये जानकीदास कपूर यांनी सुरु केलेल्या या कंपनीने पाहिल्याच वर्षात १२ हजार सायकल उत्पादनाचे रेकॉर्ड नोंदविले होते. १९७८ मध्ये या कंपनीने भारतातील पहिली रेसिंग सायकल पेश करून जगातील या प्रकारच्या सायकल कंपनीमध्ये स्वतःचा समावेश करून घेतला होता. कंपनीला ब्रिटीश स्टँडर्ड इन्स्टिट्यूशनने आयएसओ ९००१- २०१५ सर्टिफिकेट दिले आहे.

सर्व वयोगटासाठी या कंपनीने सायकल बनविल्या. १९५८ मध्ये कंपनीच्या सायकल्सची पहिली खेप निर्यात केली गेली. १९६५ मध्ये कंपनीने निर्यातीचेही रेकॉर्ड नोंदविले. २००३ मध्ये अॅटलस ग्रुपचे पुनर्गठन केले गेले आणि जयदेव कपूर नवे अध्यक्ष बनले. २००५ मध्ये अनेक विदेशी कंपन्यांसह सहकार्य करार केले गेले होते असेही समजते.

सध्या कंपनीत ले ऑफ पुकारला गेला असून त्यानुसार कर्मचारी उपस्थिती नोंदवून परत जातात. कंपनीने कच्चा माल खरेदीसाठीही पैसे नसल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Comment