कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात लोकांपर्यंत रोख रक्कम पोहचविण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून कर्ज देण्यावर जोर दिला जात आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये देखील कपात केली आहे. केवळ लॉकडाऊनमध्येच रिझर्व्ह बँकेने दोनदा रेपो रेट कमी केला आहे. सध्या रेपो रेट 4 टक्के असून, आतापर्यंतचा हा सर्वात कमी आहे. बँकांनी कर्ज प्रक्रिया देखील सोपी केली आहे. असे असले तरी देखील लोक कर्ज घेण्यास तयार नसल्याचे भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांन म्हटले आहे.
बँका कर्ज देण्यास तयार, मात्र ग्राहक जोखीम घेऊ इच्छित नाहीत – एसबीआय चेअरमन

रजनीश कुमार म्हणाले की, बँका कर्ज देण्यासाठी तयार आहेत. मात्र ग्राहक कर्ज घेण्यासाठी पुढे येत नाहीत. आमच्याकडे फंड आहे. पंरतु कर्जाची मागणी नाही. अशा स्थितीमध्ये बँकेचे पैसे रिझर्व्ह बँकेकडे ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. ग्राहक सध्या जोखीम घेण्याच्या स्थितीमध्ये नाहीत.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम (एमएसएमई) क्षेत्रासाठी 3 लाख कोटी रुपयांच्या कर्ज गॅरंटी योजनेबाबत रजनीश कुमार आशावादी आहेत. दरम्यान, बँकेने ग्राहकांना 6 महिने कर्जाचा हफ्ता भरण्यापासून सूट दिली होती. मात्र बँकेच्या केवळ 20 टक्के ग्राहकांनीच हा पर्याय निवडल्याचे कुमार यांनी सांगितले होते.