नवाजुद्दीन सिद्दिकीच्या भावावर पुतणीचे लैंगिक शोषणाचे आरोप

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या भावावर त्याच्याच अल्पवयीन पुतणीने लैंगिक शोषणाचे आरोप केले असून दिल्लीतील जामिया पोलीस ठाण्यात तिने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ‘ई टाइम्स’ला नवाजुद्दीनच्या पुतणीने दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला. माझ्यावर मी नऊ वर्षांची असताना लैंगिक अत्याचार करण्यात आले. माझ्या काकांविरोधात याविषयी मी तक्रार दाखल केली आहे. माझ्या आईवडिलांचा मी दोन वर्षांचे असताना घटस्फोट झाला. माझा माझ्या सावत्र आईने खूप छळ केला. मी लहान असताना मला समजले नाही, पण आता मला कळत आहे की त्यावेळी झालेला तो स्पर्श चुकीचा होता. त्यावेळी माझे लैंगिक शोषण करण्यात आले.

नवाजुद्दीनची पुतणी आता विवाहित असून सध्या तिच्या सासरच्यांनाही त्रास देण्यात येत असल्याचे तिने सांगितले. माझे माझ्या लग्नानंतरही सासरच्यांविरुद्ध वडील, मोठे काका नवाज यांनी खोटे खटले दाखल करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर त्यांनी कधीच विश्वास ठेवला नाही. आतासुद्धा माझे वडील दर सहा महिन्यांनी खोटे खटले दाखल करतात आणि आता माझ्या तक्रारीनंतरही ते काहीतरी करतील हे निश्चित आहे. पण माझ्या पतीची मला खंबीर साथ आहे. शारीरिक शोषणाचे पुरावे माझ्याकडे असल्याचे तिने या मुलाखतीत स्पष्ट केले.

नवाजुद्दीनकडून या संपूर्ण प्रकरणात कोणतीही मदत न मिळाल्याचेही तिने सांगितले. मी माझ्यासोबत घडलेले सगळे काही माझे मोठे काका नवाजुद्दीन यांना सांगितले होते. पण माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. मला नवाजुद्दीन काका समजू शकतील, असे वाटत होते, पण काका असे माझ्यासोबत नाही करू शकत म्हणत त्यांनी त्या गोष्टीवर पडदा टाकला, असे ती म्हणाली.

Leave a Comment